मुक्तपीठ टीम
पालघर येथील साधूंच्या हत्येला एक वर्ष उलटले तरी या हत्येचा तपास लावण्यात राज्य सरकारला यश आलेले नाही. राज्य सरकारला या प्रकरणातील आरोपींना पकडण्याची इच्छाच नसल्याचे दिसून आल्याने या हत्येचा तपास केंद्रीय गुप्तचर विभाग अथवा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे अध्यात्म आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी शुक्रवारी केली. मुंबई येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड व प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.
आचार्य भोसले म्हणाले की, ठाकरे सरकार या हत्याकांडाच्या सुत्रधारांना पकडण्याऐवजी त्यांना वाचवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे, असे दिसते आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्वाला तिलांजली देऊन मुख्यमंत्रीपद मिळवले असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. साधूंच्या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवून थातुरमातुर आरोपपत्र दाखल केले आहे.
भोसले म्हणाले की, राष्ट्रवादीचा पदाधिकारी काशीनाथ चौधरी याचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे असले तरी चौधरी यांची ‘सीआयडी’ ने चौकशीही केली नाही. घटनास्थळी आल्यावर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी काहीच हालचाल केली नाही.