मुक्तपीठ टीम
“ऑक्सिजन पुरवठ्यामध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबई जवळील नालासोपारामधील विनायक रुग्णालयात आज कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूंसाठी ठाकरे सरकारच जबाबदार आहे,” असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी “आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तातडीने राजीनामा द्यावा” अशी मागणीही केली आहे.
पाहा व्हिडीओ: https://youtu.be/HGrAOga4b_0
ही घटना पालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागात घडली आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सोमवारपर्यंत 5 हजार 968 कोरोनाचे रुग्ण असून ते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती आहेत. यातील काही रुग्णांना ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने त्यांना ऑक्सिजनची नितांत गरज आहे. पण आता ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांचे हाल होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. राजीव पाटील यांच्या दाव्यानुसार श्रीप्रस्था येथील तीन कोरोना रुग्णांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
तर संध्याकाळी नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड येथील विनायका हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मृतांच्या आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलबाहेर जोरदार हंगामा केला आहे. तुळींज पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी पोलीस फौजफाटा घेऊन पोहचले. पोलिसांनी नाराज नातेवाईकांना बाजूला करून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली.
अद्याप रुग्णालय प्रशासनाकडून याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी थेट राज्य सरकारला दोषी ठरवत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने राजकारण तापू लागले आहे.