मुक्तपीठ टीम
सुरतमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर एका कामगाराने आपल्या गावी परतायचं ठरवलं. त्याने बिहारला जाणारी गाडीही पकडली. तीही कुटुंबासोबत. पण मुझफ्फरपूरच्या गावातील घरी पोहचण्यापूर्वीच त्याने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे कोरोना नियमांतर्गत त्याचा मृतदेह रस्त्यातील रेल्वेस्थानकावर उतरवण्यात आला. सुदैवाने पहिल्या चाचणीत तरी त्याच्या पत्नी आणि मुलाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मृताच्या नातेवाईकाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी सुरतमधील कोरोना तपासणीत तो कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. तेथे उपचार योग्य पद्धतीने करता आले नाही. डॉक्टरांनी सांगितले की, तो लगेच बरा होऊ शकत नाही. बरे होण्यासाठी त्याला वेळ लागेल. त्यानंतर तो कामगार पत्नी आणि दोन मुलांसह सूरतहून मुजफ्फरपूरला निघाला. पीडित व्यक्ती ट्रेनमध्ये कोचच्या बर्थ नंबर २२ वरून प्रवास करत होता तर त्यांची पत्नी १९ नंबर बर्थवर प्रवास करत होती. बिहारमधील दानापूरच्या आधी अचानक त्याची तब्येत बिघडली. याबद्दल रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती देताच दानापूरमध्ये रेल्वेचे डॉक्टर, आरपीएफ आणि जीआरपी अधिकारी डब्यात दाखल झाले. त्या अत्यवस्थ कामगाराला प्रवास थांबवून दानापूर येथे उतरून उपचार घेण्यास सांगण्यात आले, पण कुटुंबीयांनी उपचारासाठी ट्रेनमधून उतरण्यास नकार दिला.
त्यानंतर पुढे त्याचा प्रवासातच मृत्यू झाला. प्लॅटफॉर्मवर गाडी पोहचल्यावर सुरक्षा कर्मचारी आणि डॉक्टरांनी धाडस केले आणि पीपीई किट परिधान करून मृतदेह खाली काढला. सायंकाळी ६.३०-७.०० वाजता मृतदेह उतरवण्यात आला. माहिती मिळताच बी -४ मध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. रडारड सुरु झाली. त्यामुळे कोरोनाने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची बातमी संपूर्ण स्थानकावर पसरली. रेल्वे कामगार आणि ड्युटीवर असलेले प्रवासी तेथून पळून गेले. मृत कामगाराच्या पत्नी-मुलाची तपासणी केल्यावर कोरोना निगेटिव्ह आला तेव्हा पोलिसांना दिलासा मिळाला.