मुक्तपीठ टीम
संरक्षण क्षेत्रातही आत्मनिर्भर भारत अभियानाला विशेष भर देण्यासाठी अनेक स्तरांवर काम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता डीआरडीओमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली वैज्ञानिकांची पदे भरण्याची तयारी केली जात आहे. डीआरडीओमध्ये ८०० हून अधिक पदं रिक्त आहेत. त्यामुळे या रिक्त पदांवर वर्षभरात वैज्ञानिकांची भरती करण्याचे लक्ष डीआरडीओने हाती घेतले आहे.
संरक्षण मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, डीआरडीओमध्ये वैज्ञांनिकांची एकूण ७७७३ पदे आहेत. त्यापैकी ६९५९ पदे भरली असून तब्बल ८१४ पदे रिक्त आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वैज्ञानिकांची रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. अलीकडेच वित्त मंत्रालयाने ४३४ जागांसाठीच्या भरतीस मान्यता दिली आहे. तर उर्वरित पदांच्या भरतीसाठी परवानगी लवकर मिळण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.
वेगवेगळ्या प्रयोशाळेत भरती
- डीआरडीओचे देशभरात एकूण ५२ प्रयोगशाळा आहेत.
- या भरती वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये असतील आणि बर्याच क्षेत्रांतील वैज्ञानिकांची भरती केली जाणार आहे.
- तसेच नुकताच सादर झालेल्या संसदीय समितीच्या अहवालात मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले होते की, सेवा निवृत्त वैज्ञानिकांच्या जागी भरती करण्याव्यतिरिक्त इतर भरतीदेखील करण्यात येणार आहेत.