मुक्तपीठ टीम
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना महामारीची दुसरी लाट वेगाने उफाळू लागल्याने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कठोर निर्बंधांचा निर्णय घेण्यात आला. आठवड्यात सोमवार ते शुक्रवार कठोर निर्बंध लागू असतील. शनिवारी – रविवारी मात्र राज्यात कडक लॉकडाऊन असेल. हे कठोर निर्बंध सोमवारी रात्रीपासून लागू होणार आहेत.
आता रात्री आठपासून सकाळी सातपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवावाल्यांनाच गाडी चालवण्याची परवानगी असेल. खासगी गाड्यांवर बंदी असेल. वैद्यकीय, केमिस्ट, बेकरी, दूध यांचा समावेश असेल. दुकानदार, हॉटेलांना पार्सलची मुभा असणार आहे.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मैदाने, बागा बंद राहतील. रेल्वे, बस या सार्वजनिक वाहतूक सेवेतही बसूनच प्रवास करता येणार आहे. त्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना परवानगी नसेल.
शनिवारी एका दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पन्नास हजाराकडे पोहचली तर मुंबईतील रुग्णसंख्याही दहा हजाराकडे पोहचली. त्यामुळे अखेर कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सध्या जरी लॉकडाऊन टाळले असले तरी कठोर निर्बधांचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी तीनपासून मंत्रिमंडळाची तातडीची बैठक झाली. नेहमी बुधवारी असणारी बैठक रविवारी तातडीने बोलवल्याचा कारण मुंबईसह महाराष्ट्रातही मोठ्या संख्येनं कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली.
शनिवारी एका दिवसात एकट्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दहा हजाराकडे, महामुंबई परिसरात सोळा हजाराकडे तर राज्यात पन्नास हजाराकडे झेपावली आहे. वारंवार नागरिकांना आवाहन करुनही कोरोना सुरक्षा नियमांचे पालन होताना दिसत नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेले दोन दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांशी कोरोना सुरक्षा उपाययोजनेसंदर्भात चर्चा केली. नेमके काय करावे, याबद्दल त्यांची मते जाणून घेतली. आज सकाळीही त्यांनी चित्रपट आणि टीव्ही उद्योगातील व्यावसायिकांशी चर्चा केली.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज सकाळी आठपासून मुंबईतील बाजारांचा दौरा केला, तेव्हा त्यांनाही निष्काळजी गर्दी दिसली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांचेही अनुभव तेच आहेत. त्यामुळे आज चार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने बोलवलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊन की कडक निर्बंध यावर चर्चा झाली.
मुंबईत कोरोनाचा उद्रेक
- मुंबईत शनिवारी कोरोनाचे ९०९० रुग्ण सापडले आहेत.
- मुंबईत सद्यस्थितीत ६२ हजार १८७ कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.
- मुंबईतील रुग्ण संख्या दुपटीचा कालावधी कमी होऊन ४४ दिवसांवर आला आहे.
- गोरेगाव विभागात हेच प्रमाण ३३ दिवस झाले आहे.
- वांद्रे पश्चिम येथे ३४ दिवस, अंधेरी पूर्व – जोगेश्वरी येथे ३७ दिवस, चेंबूर – गोवंडी विभागात ३७ दिवस आणि अंधेरी पश्चिम येथे ३८ दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.
महाराष्ट्रातही भयावह संसर्ग
- शनिवारी राज्यात ४९,४४७ नवीन रुग्णांचे निदान.
- शनिवारी ३७,८२१ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात शनिवारपर्यंत एकूण २४,९५,३१५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.४९% एवढे झाले आहे.
- राज्यात शनिवारी २७७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. आज नोंद झालेल्या एकूण २७७ मृत्यूंपैकी १३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८% एवढा आहे.
- शनिवारपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०३,४३,१२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,५३,५२३ (१४.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २१,५७,१३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १८,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.