मुक्तपीठ टीम
जगभराला विळखा घातलेल्या कोरोनाची दुसरी लाट देशात उफाळली आहे. देशात सर्वात जास्त कोरोनाचा फटका महाराष्ट्राला बसलेला दिसत आहे. मात्र, तसे असले तरीही केवळ महाराष्ट्रातच कोरोनाचा उद्रेक होतोय आणि अन्य सर्वत्र सर्व काही आलबेल आहे असे नाही. महाराष्ट्रातील भीषण परिस्थितीमुळे इतर राज्यांमधील उद्रेकाकडे दुर्लक्ष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
देशात दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक ५६ टक्के नव्या प्रकरणांची नोंद गेल्या आठवड्यात झाली आहे. यातील ४५ टक्के प्रकरणे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. देशात कोरोनाच्या महामारीच्या पहिल्या लाटेपासूनच महाराष्ट्र सर्वात जास्त कोरोनाग्रस्त राज्य असल्याचे दिसत आहे. आता उफाळलेल्या दुसऱ्या लाटेतील १० हॉटस्पॉटपैकी ८ हॉटस्पॉट हे महाराष्ट्रातील असल्याचे समोर आले आहे. पण महाराष्ट्राची आकडेवारी वगळली तरीही भारतात कोरोना फैलावाचं प्रमाण खूप कमी आहे, असं म्हणता येणार नाही. तसेच देशभरातील कोरोना दुसऱ्या लाटेचा धोकाही टळेल असे नाही.
नऊ राज्ये कोरोनाचे हॉटस्पॉट्स
आपण महाराष्ट्राला देशव्यापी आकडेवारीतून वगळले तरी कोरोना महामारीची गंभीर स्थिती कमी होणार नाही. कारण भारतातील अशी ९ राज्ये आहेत जी वेगाने कोरोनाचे हॉट-स्पॉट बनत चालली आहेत.
१. कर्नाटक
२. छत्तीसगड
३. पंजाब
४. तामिळनाडू
५. गुजरात
६. मध्य प्रदेश
७. केरळ
८. दिल्ली
९. उत्तर प्रदेश
कोरोना दुसरी लाट १२ दिवसांनी सुरु झाली असती…
कोरोना संसर्गाच्या साप्ताहिक सरासरीचा अभ्यास केला तर ११ फेब्रुवारीला कोरोना संसर्गाची संख्या मर्यादित होती. तेव्हाच १० हजार ९८८ नवीन रुग्ण आढळले. याच वेळी देशात दुसऱ्या लाटेची सुरू झाली. पण जर महाराष्ट्राला वगळले तरी दुसरी लाट उसळलीच असती. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या ११ फेब्रुवारीऐवजी २३ फेब्रुवारीला सर्वात किमान पातळीवर असती.
अन्य राज्यांमध्येही वाढू लागलेत कोरोना रुग्ण
दरम्यान, रोजच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या नव्या प्रकरणांची आकडेवाडी भारतातील नव्या कोरोना प्रकरणांच्या आकडेवाडीत मोजली गेली नाही तरी अन्य राज्यांत कोरोनाची नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्राशिवाय मागील ३७ दिवसात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये २८८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २३ फेब्रुवारीला जिथे सात दिवसांची सरासरी ७ हजार ३९५ होती, ती १ एप्रिलला २८ हजार ६७० पर्यंत वाढली आहे. तर यात महाराष्ट्रातील नव्या प्रकरणांची आकडेवारीसह भारतातील सरासरी सात दिवसांमध्ये ४९३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.