मुक्तपीठ टीम
दुर्गमित्र म्हटले की ते केवळ इतिहासात रमतात. शिवकालीन गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत राहतात, असे वाटते. पण दुर्गमित्र त्याही पुढे जातात. अनेकांचे जीवन साकारतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शाला अशा शिवकार्यातून जिवंत राखतात. ठाण्यातील शंभुदुर्ग प्रतिष्ठानने याच भावनेनं शहापुरातील एका जळितग्रस्त कुटुंबाचं जीवन सावरण्याची कामगिरी बजावली.
शहापूर तालुक्यातील कुल्हे गावातील तातू नारायण वरकुटे या शेतकऱ्याच्या घराला शॉर्टसर्किटने अचानक आग लागली होती. संपूर्ण घर जळाल्याने या आगीत त्यांच्या घरातील अन्नधान्य, कपडे,पैसे तसेच संसारातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. नऊ सदस्यांचे हे घर आज संपूर्ण उध्वस्त झाले. घरातील सर्व वस्तू जळाल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली.
या कुटुंबावर कोसळलेल्या मोठ्या संकटाची माहिती शंभुदुर्ग प्रतिष्ठानचे संस्थापक आदेश चौधरी यांना कळली. त्यांनी तात्काळ आपल्या संस्थेच्या जिल्हा समिती व संस्थेला जोडलेल्या सर्व सदस्यांकडून या कुटुंबासाठी काही प्रमाणात मदत उभी केली. या संकटग्रस्त कुटुंबाला अन्नधान्य व महिनाभराचा किराणा सामान, दैनदिन वापरासाठी लागणारी भांडी व महिलांसाठी कपड्यांची मदत दिली. इतर सामाजिक संस्थांनीही या कुटुंबाला मदतीचा हात द्यावा असे आवाहन शंभुदुर्ग प्रतिष्ठानने केले आहे. अधिक माहितीसाठी शंभुदुर्गचे संस्थापक आदेश चौधरी यांच्याशी 8007434338 संपर्क साधावा.
पाहा व्हिडीओ: