मुक्तपीठ टीम
‘वर्क फ्रॉम होम’ला कंटाळला असाल तर आता ‘वर्क फ्रॉम नेचर’ आणि ‘वर्क विथ नेचर’ अशा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) सध्या पुणे विभागातील रिसॉर्टवर ‘वर्क फ्रॉम नेचर’ आणि ‘वर्क विथ नेचर’ उपक्रम सुरु केला आहे.
ही संकल्पना मांडली जाताच मुक्तपीठनं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रात दखल घेतली होती. आता ती प्रत्यक्षात आली आहे. 27 ते 29 मार्च आणि 2 ते 4 एप्रिल दरम्यान आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक आणि विविध क्षेत्रातील कर्मचारी पर्यटनासाठी इच्छूक आहेत. त्यांच्यासाठी एमटीडीसी रिसॉर्टवर वायफाय झोनची मोफत सुविधा देण्यात आली आहे. एखाद्या पर्यटकाने मागणी केल्यास त्याच्या निवासी कक्षातही ही सुविधा देण्यात येत आहे. चार-पाच दिवसांची सुटी घेत रिसॉर्टवर जाऊन ठराविक वेळेत काम व उर्वरित वेळेत पर्यटनाचा आनंद घेणे शक्य आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर रिसॉर्टवरही ही सुविधा होणार आहे.
वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे आयटी आणि इतर कंपन्यांकडून नव्याने ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांना आणि खाश्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेत काम करता यावे यासाठी एमटीडीसीमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना एमटीडीसीचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दीपक हरणे म्हणाले की, वर्क फ्रॉम नेचर सुविधा पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथील एमटीडीसी रिसॉर्टवर सुरु केली आहे. पुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेजघाट, पानशेत येथील रिसॉर्टवर ही सुविधा सुरु होईल. तथापी, पर्यटकांनी कोरोना रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेत एमटीडीसी पर्यटक निवासात यावे. या ठिकाणी पर्यटकांना सर्व सुविधा आणि कोरोनाबाबतची योग्य ती सर्व खबरदारी घेतल्याचे दिसून येईल. निसर्गाचे भान ठेवून आणि कोरोनाबाबत दक्षता घेवून पर्यटन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आगामी काळात डेस्टीनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शुट, रिसेप्शन फोटोशुट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि ‘वर्क फ्रॉम नेचर’ यांना एमटीडीसीच्या पर्यटक निवासामध्ये खास सवलत देण्यात येणार आहे. अधिक माहिती आणि रिसॉर्ट बुकिंगसाठी www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटवर संपर्क करावा.
कोरोना विरोधातील लढाईचा भाग म्हणून एमटीडीसी रिसॉर्टवरील पात्र कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. पर्यटक निवासे आणि उपहारगृहे यांचे नव्याने निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. उपहारगृह आणि अनुषंगिक बाबींची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याबरोबरच शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपट्टी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ: