मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीच्या कालावधीत केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायूवर कर लावून चांगली कमाई केली असल्याचे आता समोर आले आहे. यासंदर्भात सरकारने लोकसभेत सांगितले की, तिन्ही प्रकारच्या इंधनाच्या करातून तब्बल २,९५,४०१ कोटी रुपयांची कमाई झाली आहेत. केंद्राने एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत म्हणजे दहा महिन्यांच्या दरम्यान ही कमाई केली आहे. गेल्या वर्षी मार्चच्या शेवटी, कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर जस जसा प्रादुर्भाव वाढत गेला तस तसा लॉकडाऊनचा कालावधीही वाढविण्यात आला होता.
मोदी सरकारच्या कार्यकाळातील पहिल्या वर्षात केंद्राने पेट्रोल, डिझेल आणि गॅसवरील करातून केवळ ७४,१५८ कोटी रुपये मिळवले होते. जे २०२१ मध्ये विक्रमी ३ लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे. यूपीएच्या कार्यकाळातील आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये सरकारने ५३,०९० कोटी रुपये कमावले होते. अशाप्रकारे, सन २०१४-१५ च्या तुलनेत, सन २०२०-२१ मध्ये, सरकारची कमाई चार पटींनी वाढली आहे.
दरम्यान, २०१४-१५ मध्ये केंद्राच्या एकूण कर संकलनाच्या पेट्रोल-डिझेल आणि ग्रॅसवरील कर ५.४ टक्के एवढा होता. जो २०२०-२१ मध्ये १२.२ टक्क्यांवर पोहचला आहे. जर सरकारला वेगवेगळ्या करामधून १०० रुपये कमाई होत होती, त्यात पेट्रोल-डिझेल-गॅसचा ५.४ टक्के हिस्सा होता तो आता १२ टक्क्यांपर्यंत वाढविला आहे.
यासंदर्भात अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की, केंद्र सरकारने २०१४-१५ मध्ये म्हणजेच मोदी सरकारच्या पहिल्या वर्षात पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातून २९,२७९ कोटी रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातून ४२.८८१ कोटी रुपये कमावले होते. ते म्हणाले की, चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या दहा महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलवरील कर संकलन २.९५ लाख रुपयांवर पोहचला आहे.