मुक्तपीठ टीम
मुंबईतील तीन सर्वात जुन्या वस्त्यांपैकी एक असणारी खोताची वाडी पोर्तुगीज-शैलीतील रचना आणि रंगांसाठी ओळखली जात असे. आता तो वारसा जतन करण्यासाठी त्याच पारंपरिक शैलीत काम केले जाणार आहे. आता या पोर्तुगीज शैलीतील वास्तूंना पूर्वीचे रूप परत देण्याचे काम सुरू झाले आहे.
खोताच्या वाडीतील पदपथ व गल्ल्यांना आता जुने रूप मिळेल. १८ व्या आणि १९ व्या शतकाची आठवण करुन देणारे काम केले जाईल. रस्त्यावर व पदपथावर ब्रिटीश व पोर्तुगीज शैलीमध्ये सजावट करण्यात येईल. रस्त्यावरील दिवे तसेच जुन्या शैलीमध्ये लावले जातील. नूतनीकरणासाठी आतापर्यंत ७० ते ७५ लाख रुपये खर्च झाले असून पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे. खोताचीवाडी हे दक्षिण मुंबईतील गिरगाव येथील जुनी वस्ती आहे. वाडीत जुने-पोर्तुगीज शैलीचे आर्किटेक्चर आहे. पोर्तुगीज शैली डोळ्यासमोर ठेवूनच येथील रस्तेही बांधले गेले आहेत.
अठराव्या शतकापासून खोताची वाडी बऱ्याच बदलांमधून गेली आहे. तेथे अजूनही पोर्तुगीज शैलीची घरे आहेत. पूर्वीचे साठहून अधिक बंगले आता तीसच्याही खाली गेलेत. मनपाने काही वर्षांपूर्वी या वाडीतील रस्ते व पदपथाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला होता आणि सुरुवातीला पदपथ व गल्लीसाठी पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले होते.
पेव्हर ब्लॉक्स बसविण्याबाबत स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. ते मुळच्या वास्तुरचनेला शोभणारे नव्हते. पदपथ आणि इतर दुरुस्ती अशा प्रकारे केली जाईल की, ती जुन्या स्वरूपाकडे परत येईल. पूर्वीच्या काळी पदपथ कोबाल्ट दगडाने बनलेले होते. आता सिमेंटचे पदपथ तयार करण्यात येतील, पण त्यांना कोबाल्टसारखे रुप देण्यात येईल.
पाहा व्हिडीओ: