मुक्तपीठ टीम
लष्कर म्हटले की सारा कारभार कसा कोरडा असणार. शिस्तीच्या करडेपणात भावनांना कुठे स्थान असणार? असे अनेक गैरसमज असतात. पण आपल्याला जसं वाटतं तसं नसतं. नुकताच पार पडलेला एक निरोप सोहळा त्याचीच प्रचिती देणारा होता. हा निरोप सोहळा माणसांचाही नव्हता तर होता प्रदीर्घ सेवा करणाऱ्या दोन तोफखाना यंत्रणांचा.
सर्वात प्रदीर्घ सेवा देणाऱ्या दोन तोफखाना यंत्रणांना नुकतेच सेवामुक्त करण्यात आले. १३० एमएम सेल्फ प्रोपेल्ड एम-46 कॅटॅपल्ट आणि १६० एमएम टॅम्पेला या दोन्ही तोफांना थाटात निरोप देण्यात आला. आज महाजन फील्ड फायरिंग रेंज येथून सेवामुक्त करण्यात आले. या सोहळ्यात प्रथेनुसार या तोफांमधून अखेरचे फायरिंग करण्यात आले. यावेळी तोफखान्याचे महासंचालक लेफ्टनंट जनरल के रवी प्रसाद आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
२७ कि.मी. पेक्षा जास्त मारक पल्ला असलेल्या १३० एमएम कॅटॅपल्ट विजयंता रणगाडा आणि १३० एमएम एम-४६ तोफा या प्रणाली पुरक होत्या. १९६५ आणि १९७१च्या युद्धानंतर पश्चिम सीमेवर होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी फिरत्या तोफखाना यंत्रणेच्या गरजेला ही यंत्रणा गरजेची होती. १९८१ मध्ये या तोफांच्या समावेश भारतीय सैन्यात करण्यात आला. त्यांनी बऱ्याच कारवाईंमध्ये यशस्वीरित्या कामगिरी बजावली आहे.
१९६२ मधील चीनसोबत झालेल्या युद्धानंतर उत्तर सीमेवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी शस्त्रास्त्र यंत्रणेची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ९.६ किलोमीटरची मारक क्षमता असलेल्या १६० एमएम टँपेला तोफेचा भारतीय सैन्यात समावेश करण्यात आला. मुळात इस्त्रायली संरक्षण दलाकडून आयात केलेली ही तोफ यशस्वीरित्या लीपा खोऱ्यात आणि हाजीपिर बाऊलच्या नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आल्या आणि त्यांनी नियंत्रण रेषेच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या तोफेने १९९९च्या कारगिल युद्धामध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
काही दशके भारतीय सैन्यात सेवा बजावलेल्या या शस्त्रास्त्र यंत्रणाना सेवामुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी नवीन तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या नवीन उपकरणांचा भारतीय सैन्यात समावेश करण्यात येणार आहे.
पाहा व्हिडीओ: