मुक्तपीठ टीम
केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात सुमारे १० लाख बँक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (१५, १६ मार्च) दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपामुळे बँकांच्या शाखांमधून चालणाऱ्या व्यवहारांवर परिणाम झाला आहे. एका अंदाजानुसार सोमवारी पहिल्या दिवसाच्या संपामुळे किमान १६ हजार ५०० कोटी रुपयांचे चेक क्लिअर होऊ शकलेले नाहीत.
खासगीकरणाच्या विरोधात बँक कामगारांचा देशव्यापी संप आज दुसर्या दिवशीही सुरु आहे. या संपात देशभरातील जवळपास १० लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाल्याने सोमवारी पहिल्याच दिवशी सरकारी बँकांची सेवा कोलमडली. मुंबईसह प्रमुख शहरात सार्वजनिक बँकांची कार्यालये संपामुळे ओस पडली होती. संपाच्या पहिल्याच दिवशी बँकिंग ऑपरेशन पूर्ण ठप्प झाले. संपामुळे बँकांमध्ये रोख रक्कम जमा झाली नाही, पैसेही काढले नाहीत. संपामुळे चेक क्लिअरिंगचे काम होऊ शकले नाहीत.
बँकांमध्ये या सेवा ठप्प आहेत
- पैशांचा थेट व्यवहार नाही
- पैसे जमा नाही झाले ना थेट काढले गेले
- कर्ज प्रक्रिया झाली नाही
- एनईएफटी, आरटीजीएस, परकीय चलन पूर्ण झाले नाही
एआयबीईए, एआयबीओसी, एनसीबीई, एआयबीओए, बीईएफआय, आयएनबीओसी, एनओबीडब्ल्यू आणि एनओबीओ या नऊ संघटनांच्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने म्हणजेच यूएफबीयूने दोन दिवसांचा संप पुकारला आहे.
बँक संघटनांचे म्हणणे आहे की संपामुळे चेन्नई, मुंबई आणि दिल्ली या तीन राष्ट्रीय ग्रिडमधील तब्बल १६,५०० कोटीचे चेकचे व्यवहार होऊ शकले नाहीत. या व्यतिरिक्त बर्याच लोकांना अडचणीही आल्या. माहिती नसल्यामुळे बरेच लोक बँकेत गेले, पण त्यांना परत यावे लागले. तथापि, बँकांनी आपल्या ग्राहकांना व्यवहारासाठी डिजिटल माध्यम वापरावे, अशी माहिती यापूर्वीच दिली होती.
बँकांचा संप किती मोठा?
- सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी, विदेशी, प्रादेशिक ग्रामीण बँकेतील दहा लाखांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपामध्ये सहभागी आहेत.
- महाराष्ट्रातील दहा हजारांपेक्षा जास्त शाखांमधील अंदाजे पन्नास हजार बँक अधिकारी आणि कर्मचारी दोन दिवसांच्या संपात सहभागी आहेत.
- अधिकारी-कर्मचारी संपावर जात असलेल्या बँका १५० लाख कोटी रुपयांचा म्हणजे एकूण बँकिंग व्यवसायाच्या ७० टक्के व्यवसाय हाताळतात.
- सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून सेवा शाखा ज्या चेक क्लिअरिंगचे काम पाहतात तेथून संपाची सुरुवात झाली.
- आज मंगळवार, १६ मार्च रोजी रात्री बारापर्यंत बँकांचे कामकाज बंद राहील.
- बँकांच्या संपात सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक अशा सर्व श्रेणीतील अधिकारी सहभागी होत असल्यामुळे संप शंभर टक्के यशस्वी आहे, असा दावा अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी केला आहे.