मुक्तपीठ टीम
राजकीय नेते मंडळी, अभिनेत्यानंतर आता भारतीय सैन्यातील हनीट्रॅपची एक घटना समोर आली आहे. पाकिस्तानी गुप्तचर महिला एजंटच्या जाळ्यात अडकलेल्या भारतीय जवानाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून संबंधित जवानाला हनीट्रपमध्ये फसवल्याचे उघड झाले आहे. भारतीय जवानाने फेसबुकच्या माध्यमातून भारतीय लष्कराची अनेक गोपनीय माहिती संबंधित महिला एजंटला दिली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी आकाश महरिया याला आर्मी इंटेलिजन्सकडून अटक करण्यात आली आहे.
संशयित आरोपी जवान आकाश महरिया हा राजस्थानमधील सीकरच्या लक्ष्मणगड येथील रहिवासी आहे. आर्मी इंटेलिजन्सने त्याला फतेहपूर येथून पकडले आहे. सैन्यातून सुट्टी घेऊन आपल्या गावी जवान आला, तेव्हा पाकिस्तानी महिला एजंटने बनावट फेसबुक अकाऊंट काढून आकाश महरिया याच्याशी संपर्क साधला होता. फेसबुक अकाऊंटवरून फ्रेन्ड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर दोघांची मैत्री झाली होती.
चौकशीदरम्यान आकाशने सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने एका महिलेशी मैत्री केली होती. परंतु ती पाकिस्तानी एजंट आहे की नाही हे माहित नव्हते. संभाषणादरम्यान सैन्याशी संबंधित काही माहिती देण्यात आली असल्याची कबुलीही त्याने दिली. इंटेलिजन्सने त्याचा मोबाइल जप्त केला आहे. त्याचबरोबर त्याला न्यायालयात हजर करून ५ दिवसांच्या रिमांडची मागणी केली आहे.
बँक खात्यांची माहिती गोळा केली जात आहे
संशयित जवानाच्या बँक खात्याची माहितीही गोळा केली जात आहे. सैन्याबद्दल माहिती देण्याच्या बदल्यात काही आर्थिक फायदा झाला का, ते तपासले जात आहे. आतापर्यंत काय आणि कोणती माहिती दिली गेली आहे याविषयी गुप्तचर यंत्रणा आकाशकडे विचारपूस करत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
- आकाशची फेसबुकवर त्या पाकिस्तानी एजंटशी मैत्री झाली त्यानंतर तो व्हॉट्सअॅपवर त्या महिलेशी संपर्कात होता.
- ती महिला जवानाला भेटण्याचं आमिष दाखवत प्रेमाचे नाटक करीत होती.
- त्याच्याशी मधाळ चॅट करताना त्याच्या बटालियन आणि सैन्याबद्दल माहिती गोळा करीत होती.
- इंटेलिजन्स पहिल्यापासूच अशा घटनांवर नजर ठेवून असते.
त्यातच सीकर जिल्ह्यातील एका नंबरवर पाकिस्तानामधून कॉल आल्याचे कळताच लक्ष वाढवले गेले आणि तो पकडला गेला.
हनी ट्रॅप म्हणजे काय?
- एखाद्या पुरुष सावजाला जाळ्यात ओढण्यासाठी सुंदर स्त्रीचा आमिषासारखा वापर केला जातो, त्याला हनी ट्रॅप म्हणतात.
- हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या अधिकारी, प्रभावशाली, श्रीमंत पुरुषांना सदर महिलेकडून गोडीगुलाबीने चलाखीने माहितीसाठी वापरून घेतले जाते.
- काहीवेळा पुरुष सहकार्य करत नाहीत तेव्हा मात्र हनी ट्रॅप कटानुसार घडवलेल्या संबंधांचे व्हिडीओ ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले जातात. इप्सित साध्य केले जाते.
- जागतिक पातळीवर लष्करी हेरगिरी, कॉर्पोरेट हेरगिरी, राजकीय हेरगिरी यात हनी ट्रॅपचा शस्त्रासारखा वापर केला जातो.
- भारतातही राजकीय नेत्यांचे करिअर संपवण्यासाठी किंवा निवडणुकीच्या तोंडावर अपप्रचार करण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर करतात.