मुक्तपीठ टीम
केंद्र शासनाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या खासगीकरणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात सुमारे १० लाख बँक कर्मचाऱ्यांनी आज सोमवारपासून (१५, १६ मार्च) दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपामुळे बँकांच्या शाखांमधून चालणाऱ्या व्यवहारांवर परिणाम होणार आहे.
बँकांचा संप किती मोठा?
- सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी, विदेशी, प्रादेशिक ग्रामीण बँकेतील दहा लाखांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपामध्ये सहभागी आहेत.
- महाराष्ट्रातील दहा हजारांपेक्षा जास्त शाखांमधील अंदाजे पन्नास हजार बँक अधिकारी आणि कर्मचारी दोन दिवसांच्या संपात सहभागी होत आहेत.
- अधिकारी-कर्मचारी संपावर जात असलेल्या बँका १५० लाख कोटी रुपयांचा म्हणजे एकूण बँकिंग व्यवसायाच्या ७० टक्के व्यवसाय हाताळतात.
- सकाळी सहा वाजल्यापासून सेवा शाखा ज्या चेक क्लिअरिंगचे काम पाहतात तेथून संपाची सुरुवात झाली.
- मंगळवार, १६ मार्च रोजी रात्री बारापर्यंत बँकांचे कामकाज बंद राहील.
- बँकांच्या संपात सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक अशा सर्व श्रेणीतील अधिकारी सहभागी होत असल्यामुळे संप शंभर टक्के यशस्वी होईल, असा दावा अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी केला आहे.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात आयडीबीआय आणि दोन खासगी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात घोषणा केली होती. त्यामुळे कर्मचारीवर्गात रोजगार सुरक्षेविषयी भीती निर्माण झाली. तीन बैठकांमध्ये चर्चा केल्यानंतरही मार्ग काढण्यात आला नसल्याने अधिकारी-कर्मचारी वर्गात सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातूनच संपाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
संपात कोणत्या संघटना सहभागी?
• ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन
• नॅशनस कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज
• ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन
• ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन
• इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस
• इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन
• नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स
• नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स
• बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया