सुप्रिया
आजपासून ७५ वर्षांआधी १९४७ रोजी बलाढ्य अशी रामदास बोट अरबी समुद्रात बुडाली होती. या बोटीवर ७०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. स्वातंत्र्यपूर्व काळातली, स्वाभिमानी देशभक्तांनी काढलेल्या इंडिन को- ऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनीची ही एस.एस. रामदास बोट. मुळात ही बोट स्कॉटलंडच्या स्वान अँड हंटर कंपनीत आकाराला आली. ‘क्वीन एलिझाबेथ’ ही आलिशान बोट या कंपनीने बांधली होती. त्याच कारखान्यात रामदास बोट तयार केली गेली.
एस.एस. रामदास बोटीची वैशिष्ट्ये
- रामदास बोट ही १७९ फूट लांब आणि २९ फूट रुंद
- बोटीचं एकूण वजन ४०६ टन
- १ हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता
- अत्यंत देखणी अशी ही रामदास बोट १९३६ मध्ये नावारुपाला आली.
- त्यानंतर काही वर्षांनी तिची मालकी इंडियन कोऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनीकडे आली.
- ब्रिटिशांविरोधात उभं राहून कंपनीने कोकण गोवा किनारपट्टीवर बोट सेवा सुरु केली.
रामदास बोटीला १७ जुलै १९४७ रोजी जलसमाधी
रामदास बोट सकाळी ८ वाजता मुंबईतल्या भाऊच्या धक्क्यावरुन रेवसला जाण्यासाठी निघाली. त्यादिवशी गटारी अमावस्या असल्याने प्रवाश्यांची आपलं घर गाठण्यासाठी मोठी गर्दी होती. मुंबईतले चाकरमानी सुटुट्यांमुळे आपल्या घरी जायला निघाली होती. वृद्ध,वारकरी,गर्भवती महिलांसह बोटीवर ७०० हून अधिक जण होते. बोट निघाली तेव्हा पाऊस पडत होता. अर्ध्या तासातच सर्वजण रेवसला पोहोचणार होते. बंदरापासून १३ किलोमीटरपर्यंत गेल्यावर उसळणाऱ्या लाटांचा तडाखा बसू लागला. त्याचवेळी एक मोठी लाट आली, बोट एका बाजूला कलंडली आणि काही मिनिटातच बोटीला जलसमाधी मिळाली.
१७ जुलै १९४७ रोजी ही दुर्घटना घडली आणि बरोबर एका महिन्याने १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. या दुर्घटनेचे पडसाद मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पुढचे कितीतरी महिने जाणवत होते.