मुक्तपीठ टीम
देशातील ४० कोटी नागरिकांना अजूनही कोरोनाचा धोका असल्याची बाब चौथ्या सेरो सर्वेक्षणातून समोर आली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हमजे आयसीएमआरने मंगळवारी चौथ्या सेरो सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली. हे सर्वेक्षण जून-जुलै दरम्यान करण्यात आले होते. या सर्वेक्षणातून ६७.७ टक्के लोकांमध्ये कोरोना अँटीबॉडीज आढळल्या आहेत. म्हणजेच ६७.७ टक्के लोकांना कोरोना झाला होता.
२१ राज्यातील ७० जिल्ह्यांमध्ये सेरो सर्वेक्षण
- आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, राष्ट्रीय सेरो सर्वेक्षणाचा चौथा टप्पा २१ राज्यातील ७० जिल्ह्यांमध्ये जून-जुलैमध्ये घेण्यात आला.
- यात ६ ते १७ वयोगटातील मुलांचा समावेश आहे.
- सर्वेक्षणात सहभागी आरोग्य कर्माचऱ्यांमध्ये ८५ टक्के अँटीबॉडी आढळली.
- यापैकी १० टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली नव्हती.
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकसंख्येला कोरोनाचा धोका आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या गर्दीपासून दूर राहा आणि गर्दी करू नका. आवश्यक असेल तरच प्रवास करा आणि लस घेतल्यानंतर प्रवास करायला हवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सर्वेक्षणात २८,९७५ सामान्य नागरिक आणि ७,२५२ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्वेक्षण जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आला. यात २१ राज्यांमधील ७० जिल्ह्यांचा समावेश आहे.