मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या ११ बालकांना ५ लक्ष रुपये मुदत ठेव प्रमाणपत्राचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. माता-पित्याचे छत्र हरवलेल्या मुलांच्या भविष्यासाठी राज्य शासन कायम त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्री अस्लम शेख यांनी यावेळी दिली.
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले, कोरेनाचे संकट भयंकर होते, जगाला हादरवून टाकणाऱ्या या संकटामुळे काळाने आपल्यातील अनेकांना हिरावून नेले. या संकटात ज्यांचे माता-पित्याचे छत्र हरपले आहे, अशा ११ मुलांना पाच लाख रुपयांची मुदत ठेव त्यांच्या नावे ठेवून त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. राज्यशासन अशा छत्र गमावलेल्या मुलांच्या शिक्षण आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याच्या प्रक्रियेत निश्चितपणे त्यांच्या सोबत आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या पाठीशी राज्य सरकार आणि प्रशासन भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही देखील पालकमंत्री अस्लम शेख यांनी यावेळी दिली.