मुक्तपीठ टीम
बृहन्मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. सरळसेवा आणि पदोन्नती अंतर्गत १,१०,५०९ मंजुर पदे असताना यापैकी ३८,१२८ पदे ही रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. सर्वाधिक पदे ही क आणि ड वर्गाची असून त्याची संख्या ३३,०४३ आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची माहिती मागितली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासनाने अनिल गलगली यांस सप्टेंबर २०२० पर्यंतचा उपलब्ध अभिलेखाची माहिती दिली. यात सरळसेवा तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गात एकूण ८७,१४६ पदे मंजुर असून २८,६०८ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक क गटात १०,५५३ तर ड वर्गात १५,७८९ पदे रिक्त आहेत. यात पदोन्नती तांत्रिक आणि अतांत्रिक वर्गात एकूण २३,३६३ पदे मंजुर असून ९५२० पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक ड वर्गात ५०२० पदे रिक्त आहेत. क आणि ड वर्गात दोन्ही संवर्गात ३३,०४३ पदे रिक्त आहेत.
अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी. रिक्त पदामुळे कामकाजावर परिणाम होतो आणि नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागतो, असे गलगली यांचे म्हणणे आहे.