मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या संकटात लागू झालेल्या संचारबंदीमुळे अनेक गरीब आणि गरजू लोकांची एकवेळच्या जेवणाची फार भ्रांत होवू लागली आहे. या संकटाच्या काळात मिरा रोड मधील सोसायटी आधारवड बनली आहे. या सोसायटीतील एका तरुणानं, आपल्या मित्र मैत्रिणीच्या आणि सोसायटीतील सदस्यांच्या मदतीने अन्नदान करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. आणि त्याला भरभरुन साथही मिळत आहे.
खरंतर २६ वर्षीय मितेश गुप्ता हा तरुणही लॉकडाउनमध्ये होरपळलेला आहे. मागच्या वर्षी जूनमध्ये त्याची चांगली नोकरी लॉकडाउनने हिरावून घेतली. नंतर कुठे स्नॅक कॉर्नरचा व्यवसाय त्याने चालू केला. तोही या लॉकडाउनमध्ये ठप्प झाला. लॉकडॉउनमुळे गरजू लोकांची उपासमार होत असल्याच त्याला समजल्यावर मितेश गुप्ताने सोसायटीच्या सदस्यांबरोबर एक कम्युनिटी किचन बनवले. ३० एप्रिलला ७० लोकांच्या अन्नदानापासून सुरु केलेला हा संकल्प आता वाढताच आहे. सध्या दररोज ४०० हून अधिक लोकांना अन्नदान करत आहेत. गेल्या २५ दिवसात, त्यांनी नऊ हजाराहून अधिक लोकांना अन्नदान केले आहे. मितेशच्या या कार्यात त्याला त्याच्या कुटुंबाबरोबर मित्र मैत्रिणी आणि सोसायटीतील सदस्यांच्याही साथ मिळतेय.
मितेश जवळपासच्या रूग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक, रिक्षा आणि टॅक्सी चालक, सुरक्षा रक्षक, निराधार व्यक्तींमध्ये अन्नाची पाकिटे वाटतो. मितेशने मोठ्या प्रमाणात गरजुंची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या सामाजिक कार्यात सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन ही मितेशने यावेळी केले आहे तर शासनानेही अशाप्रकारची संकल्पना राबवण्याची मागणी ही मितेशने यावेळी केली आहे. स्वतःचा जॉब सुटला तरी दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छाशक्ती सुटली नाही. मितेशच्या या कार्याच सर्व थरातून कौतुक केलं जात आहे.
पाहा व्हिडीओ: