मुक्तपीठ टीम
आज देशात दुर्देवी घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात मुंबईच्या विरार इथल्या रुग्णालयाला आग लागल्याने १३ जणांचा नाहक बळी गेला. त्याचवेळी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी आली आहे. दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावामुळे गेल्या २४ तासांत २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आश्चर्याची बाब अशी की, या मृत्यूकांडानंतरही सरकारी यंत्रणा हललेली नाही. रुग्णालयात फक्त दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असल्याने आणखी ६० रुग्णांचा जीव धोक्यात आहेत.
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालकांनी गेल्या २४ तासांत २५ रुग्णांचा मृ्त्यू झाल्याची बातमी दिली आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन आणखी दोन तास चालेल. व्हेंटिलेटर आणि बिपॅप प्रभावीपणे कार्य करत नाहीत. ऑक्सिजनची तातडीने गरज आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे इतर ६० रुग्णांचे जीवन धोक्यात आहेत.
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक पुढे म्हणाले की, आयसीयू आणि आपत्कालीन वैद्यकीय विभागात विना-यांत्रिकी पद्धतीने व्हेंटिलेशन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राजधानी दिल्लीत रुग्णालयांकडून रुग्णांना नकार!
- राजधानी दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता झाल्यानंतर अनेक रुग्णालयांनी कोरोनाच्या नवीन रुग्णांची भरती थांबविली आहे.
- सर गंगाराम रुग्णालयाप्रमाणे दिल्लीतील हिंदूराव रूग्णालयात ऑक्सिजनचा फक्त कमी कालावधी पुरवठा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत आयसीयूला उर्वरित ऑक्सिजनचा वापर करण्यास व वॉर्डांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनचा वापर करण्यास सांगितले गेले आहे, ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता रुग्णालयाने नवीन कोरोना रूग्णांची भरती थांबविली आहे.
- दिल्लीमधील रोहिणीतील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ऑक्सिजनच्या टंचाईनंतर नवीन रुग्णांची भरती बंद करण्यात आली आहे.
- अपोलो, मॅक्स, विम्हन्स सारख्या रुग्णालयात नवीन रूग्णांना काही काळ प्रवेश मिळाला नाही.