मुक्तपीठ टीम
भारतासाठी पुन्हा एकदा अभिमानास्पद बातमी आहे. आता भारतात बारावी महिला लढाऊ विमानाची वैमानिक असणार आहे. २३ वर्षीय माव्या सुदान ही जम्मू-काश्मीरची पहिली महिला आहे, जिला भारतीय वायूसेनेत लढाऊ पायलट होण्याचा मान मिळाला आहे. राजौरीची रहिवासी असलेली माव्या ही देशातील बारावी महिला लढाऊ पायलट आहे.
राजौरी येथील लंबेडी गावात राहणारी माव्या जम्मूमधील कार्मल कॉन्व्हेंट स्कूलमधून शिकली आहे. माव्याला शाळेत असल्यापासूनच हवाई दलात रुजू व्हायचे होते. ती नेहमी फायटर पायलट बनून विमान उड्डाण करण्याविषयी बोलत असे. आज तिचे स्वप्न सत्यात उतरले. तिने चंदीगढमधील डीएव्हीमधून राज्यशास्त्रात पदवी संपादन केली. माव्याने गेल्या वर्षीच हवाई दलाची प्रवेश परीक्षा दिली होती. शनिवारी हैदराबादच्या दुंडीगल एअर फोर्स अॅकॅडमी येथे झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये माव्याने एकमेव महिला लढाऊ पायलट म्हणून भाग घेतला. हवाई दलात उड्डाण करणारे अधिकारी म्हणून तिची नेमणूक झाली आहे. यावेळी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया हे देखील उपस्थित होते.
भारतीय महिला लढाऊ वैमानिकांची परंपरा…
- २०१६ मध्ये बिहारच्या भावना कंठ यांना हवाई दलात लढाऊ विमान उडविणारी पहिली महिला पायलट होण्याचा मान मिळाला.
- अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंहही त्यांच्याबरोबर लढाऊ पायलट झाल्या.
- अवनी या मध्य प्रदेशातील रिवा येथील रहिवासी आहे.
- तिचे वडील एग्झीक्यूटिव्ह इंजिनीयर आहेत आणि भाऊ सैन्यात आहेत.
- भावना बिहारमधील बेगूसराय येथील आहे.
- मोहना गुजरातच्या बडोदरा येथील आहे.
- तिचे वडील हवाई दलात वॉरंट अधिकारी आहेत.