मुक्तपीठ टीम
२०१६ च्या नोटाबंदीनंतर ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा चलणात आल्या. यावेळी ५०० आणि १ हजार रुपयांची नोट चलनातून काढण्यात आली. मात्र नोटाबंदीच्या काळात जारी करण्यात आलेली २ हजारची नोट सध्या क्वचित बघायला मिळत आहे. बँकांच्या एटीएम आणि बाजारात २ हजारांच्या नोटांचा वापर कमी झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता २००० च्या नोटा कुठे गेल्या? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या काही वर्षांपासून २००० हजार रुपयांच्या नोटांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे.
सध्या जवळपास २१४ कोटी नोटांचा वापर सुरू…
- मार्च अखेरीस दोन हजाराच्या नोटांचा चलनातील वाटा कमी झाला असून १.६ टक्के इतकाच राहिला आहे.
- सध्या जवळपास २१४ कोटी नोटांचा वापर सुरू आहे.
- या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व मूल्याच्या नोटांची एकूण संख्या १३ हजार ५३ कोटी इतकी होती.
- त्याआधी एक वर्षाच्या आधी हा आकडा १२ हजार ४३७ कोटी इतका होता.
२०२१ अखेरीस २००० रुपयांच्या नोटांची संख्या घटून २४५ कोटी रुपयांवर…
- भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, मार्च २०२० च्या अखेरीस चलनातील व्यवहारात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांची संख्या २७४ कोटी इतकी होती.
- हा आकडा चलनात असलेल्या एकूण नोटांच्या संख्येच्या अनुषंगाने २.४ कोटी इतका होता.
- त्यानंतर मार्च २०२१ अखेरीस २ हजार रुपयांच्या नोटांची संख्या घटून २४५ कोटी रुपये किंवा दोन टक्के इतकाच राहिला.
- नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात हा आकडा २१४ कोटी रुपये म्हणजे जवळपास १.६ टक्के राहिला.
- मार्च २०२० मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य हे सर्व मूल्यांच्या नोटांच्या तुलनेत २२.६ टक्के होते.
- त्यानंतर मार्च २०२१ अखेरीस हा आकडा कमी होऊन १७.३० टक्के आणि मार्च २०२२ मध्ये १३.८ टक्के इतका झाला.