मुक्तपीठ टीम
टीईटी घोटाळ्यात दररोज नवनवीन खळबळजनक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत सोनं, हिरे आणि चांदी जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून टीईटी परीक्षा प्रकरणी कारवाई सुरुचं आहे.
पुणे पोलिसांनी बंगळुरुमधून आश्विन कुमारच्या घरातून २४ किलो चांदी आणि २ किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्विन कुमार जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा प्रमुख आहे. जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला २० ते २१ डिसेंबरला बंगळूरमधून अटक करण्यात आली होती.
पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याच्या कार्यालयातून गेल्या चोवीस तासात ५० लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या परिचिताकडून काल रात्री २५ लाख रुपये जप्त केले होते. त्यानंतर आणखी एकदा त्याच्या कार्यालयावर छापा टाकत पुणे पोलिसांनी ३३ लाख रुपये जप्त केले आहेत. पुणे पोलिसांना २४ तासात तुकाराम सुपेकडून ५८ लाख रुपये जप्त करण्यात यश आलं आहे. यापूर्वी एक कोटी ५८ लाख आणि ९० लाख सुपेकडून आणि त्याच्या नातेवाईकांकडून जप्त करण्यात आले होते. तुकाराम सुपेकडून आतापर्यंत ३ कोटी ८७ लाख रुपये आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेची आणखी चौकशी केली असता त्याला पैसे लपवण्यात त्याची मुलगी कोमल पाटील आणि जावई नितीन पाटील यांनी मदत केल्याचं समोर आलं होतं. पुणे पोलिसांनी यानंतर त्या दोघांना चौकशीला बोलावलं. यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून चौकशी करुन छापा टाकून १ कोटी ५८ लाखांची रोकड आणि ७० लाखांचं सोनं हस्तगत केलं होतं.