मुक्तपीठ टीम
मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचे स्थानक आणि अतिशय महत्वाचं रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाला १३४ वर्ष पूर्ण झाली आहेत. दक्षिण मुंबईत असलेल्या या रेल्वे स्थानकातून दररोज ३० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. दररोज १८ प्लॅटफॉर्मवरून १२००हून अधिक रेल्वे गाड्या धावतात.
दक्षिण मुंबईच्या महत्वामुळेच तेथून रेल्वेची सुरुवात
- पश्चिम समुद्र किनारपट्टीवरील सुरक्षित नैसर्गिक बंदर असल्याने मुंबई हे ब्रिटिशांचे मोठे व्यापारी केंद्र होते.
- त्याकाळातही मुंबईच्या दक्षिण भागात दररोज हजारो लोकांची वर्दळ असे.
- त्या भागातच मुंबईची सर्व प्रमुख बंदरं आणि गोद्या असल्याने वस्तू आयात आणि निर्यात होत असे.
- त्यामुळे ब्रिटिशांनी रेल्वे सेवा सुरु करताना हा भाग निवडला.
- छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या आधी बोरीबंदर रेल्वे स्थानक होते.
- भारताची पहिली रेल्वे गाडी या बोरीबंदर रेल्वे स्थानकातून ठाण्याकडे गेली.
वाहतूक वाढल्यानं मोठ्या रेल्वे स्थानकाची निर्मिती
- बोरीबंदर रेल्वे स्थानकातील जागा अपूरी पडू लागली, तेव्हा ब्रिटीशांनी एक मोठे स्थानक बनवण्याचा निर्णय घेतला.
- या स्थानकाची रचना फेड्रीक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटीश स्थापत्यकाराने केली आहे.
- या कामासाठी फेड्रीक यांना त्याकाळी १६ लाख १४ हजार रुपयांचे मानधन देण्यात आले होते.
- १८७८ मध्ये रेल्वे स्थानक उभारण्याचे काम सुरू झाले.
- या इमारतीत भारत, ब्रिटन आणि इटलीची वास्तुकले दिसते.
- मुख्य इमारतीत वाळू आणि चुनखडीचा वापर केला गेला आहे.
- इटालियन मार्बल आणि भारतीय निळ्या रंगाचा दगड सौंदर्यासाठी स्थापित केला आहे.
- १८८७ मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस ही मुंबईतील सर्वात उंच इमारत होती.
- स्टेशनच्या मध्यवर्ती हॉलमध्ये स्टार-आकाराचे डिझाइन आहे, म्हणून हॉलला स्टार चेंबर म्हणतात.
- सध्या येथेच मुख्य तिकीट घर आहे.
- स्थानकाची रचना ही व्हिक्टोरियन इटालियन गॉथिक रिव्हायवल प्रकारची आहे.
इंग्लंडची महाराणी ते भारताचे छत्रपती शिवाजी महाराज!
- १८८७ च्या २० जूनला स्थानकाचे काम पूर्ण झाले आणि ते रेल्वे वाहतुकीसाठी उघडण्यात आले.
- इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त स्थानकाचे उद्घाटन झाले.
- त्यामुळे या स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) असे ठेवण्यात आले.
- या इमारतीच्या मध्यभागी क्वीन व्हिक्टोरियाची एक पुतळा होता, परंतु जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा तो पुतळा काढून टाकण्यात आला.
- १९९६मध्ये या स्थानकाचे नामांतर करण्यात आले.
- छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) असे ठेवण्यात आले.
- स्थानकाला २ जुलै २००४ रोजी युनेस्कोचा जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले.
- २००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यांमध्ये या स्थानकालाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.
- २०१७ साली जून महिन्यामध्ये स्थानकाच्या नावात महाराज हा शब्द वाढवण्यात आला आणि तेव्हा पासून हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) म्हणून ओळखले जाते.