मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत तारखांची घोषणा केली. बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ च्या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहे.
यंदा एचएससी (इ. १२ वी) बोर्डाची परीक्षा येत्या २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल.#hscexam pic.twitter.com/5bMXXwevNd
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 21, 2021
निकाल कधी?
बारावीचा निकाल अंदाजे जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. तर दहावी परीक्षेचा निकाल आँगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.
कोरोना संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करुन परिक्षेचे आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असे प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
एसएससी (इ. १० वी) बोर्डाची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल.#sscexams2021#sscexam pic.twitter.com/AXhFsbo9lf
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) January 21, 2021
“कोरोनाच्या काळात अनेक शालेय विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. तसेच त्यासाठी विशेष मोहीमही राबविण्यात येणार आहे”, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. विद्यार्थी व पालकांनी या संदर्भात काही तक्रारी असतील तर स्थानीक शिक्षण अधिकारी वर्गाकडे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
या पत्रकार परिषदेत शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि सहाय्यक संचालक दिनकर टेमकर उपस्थित होते.