मुक्तपीठ टीम
कोरोनाची दुसरी लाट तरुणाईलाही हादरवणारी ठरत आहे. त्याचवेळी पालघर जिल्ह्यातील एका आजोबांनी कोरोनावर मात करत आपण कुणीही कोरोनाला हरवू शकतो, ही उमेद जागवली आहे. पालघरच्या विरेंद्र नगरमध्ये राहणारे शामराव इंगळे यांचे वय १०३ वर्षे आहे. त्यांनी वयाचं शतक ओलांडलं असतानाच कोरोनालाही परतवण्याची कामगिरी बजावली आहे.
शामराव इंगळेंना ताप आला होता. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर आजोबांना पालघरच्या शासकीय कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. तेथे दाखल करतेवेळी त्यांना श्वसनाचा त्रास होता. त्यांची ऑक्सिजन पातळी ८२ पर्यंत घसरली होती. पाच दिवस त्यांना ऑक्सिजनवर ठेवल्यावर त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला आणि ते लवकर बरेही झाले.
पालघर शासकीय कोरोना रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन नवले म्हणाले की, उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये दाखल झाल्यावर ते जराही घाबरलेले नव्हते. त्यांनी उपचारांना चांगली साथ दिली. त्यामुळे ते लवकर बरेही झाले.
कोरोनाच्या उपचारानंतर आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. एक शतकवीर कोरोनावर मात करुन घरी सुखरूप परतत असल्याने डॉक्टरांनी त्यांना आपुलकीनं निरोप दिला. त्यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, प्रांताधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनील शिंदे उपस्थित होते.
शामराव आणि त्यांच्या घरातील सर्व त्यांच्या बरे होण्याचे श्रेय देतात ते पालघर कोरोना सेंटरमधील सर्व डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना. पण त्याचवेळी शामरावांनी घेतलेली काळजी, त्यांचा धीटपणा आणि वैद्यकीय उपचारांना साथ देण्याची वृत्ती, यामुळेही फायदा झाला. जर हिंमतीनं सामना केला तर कोरोनावर मात करणं अवघड नाही, हे शामरावांनी दाखवून दिलं आहे.
पाहा व्हिडीओ: