सुरळीत आणि प्रदूषणविरहीत प्रवासासाठी आता मुंबईकरांची ज्युनियर टीम पुढे सरसावलीय. यावर्षी 14 नोव्हेंबरला म्हणजे बालदिनाला मुंबईतील बच्चे कंपनींचा एक समूह वेगळा उपक्रम राबवणाराय. मालाड पश्चिम येथील माइंडस्पेस इथं एक सायकलिंग कार्यक्रम आयोजित केला आहे. “सायकल चालवा – शहर वाचवा” या संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केलाय.
सध्या मुंबईत वाहतुक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. त्यामुळे वायू प्रदूषणदेखील मोठ्या प्रमाणात होते. म्हणुनच वाहतुक कोंडी आणि वायू प्रदूषण यांसारख्या समस्येतून मुंबईला वाचवण्यासाठी सायकलींचा वापर मोठ्याप्रमाणात करण्याचा संदेश ही संघटना देतेय. तसेच मुंबई हे प्रदूषणमुक्त शहर होण्यासाठीही प्रयत्न करण्याचा उद्देश लोकांच्या मनावर बिंबवला जाईल.
“सायकल चालवा शहर वाचवा” ही जागरुक मुंबईकरांची संघटना आहे. ही संघटना मोटार नसलेल्या गाड्यांचे, सुदृढ आरोग्याचे आणि फिटनेसला प्रोत्साहन देते. सायकल चालवण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईच्या २४ नगरपालिका विभागांमध्ये हृदयाच्या आकाराचे मार्ग तयार करण्यात आले आहेत. शहरात समस्याविरहीत वाहतूक हवी असेल तर सायकल चालवावी असा प्रचार या संघटनेमार्फत केला जात आहे.