मुंबई :- वांद्रे येथे एका व्यावसायिकाचे अपहरण करुन दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपहरणासह लुटमारीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे. यातील तक्रारदार व्यावसायिक असून ते भायखळा परिसरात राहतात. त्यांचा वाहनांचा स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय आहे. दोन दिवसांपूर्वी ते त्यांच्या अंधेरीतील वर्सोवा परिसरातील मित्राला भेटण्यासाठी आले होते, मित्राला भेटून ते अंधेरी येथून वांद्रेच्या दिशेने जात होते. पहाटे चार वाजता ते रिक्षाची वाट पाहत होते.
यावेळी एका रिक्षातून दोन तरुण आले आणि त्यांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांचे रिक्षातून अपहरण केले. ही रिक्षा घेऊन ते सांताक्रुज परिसरात आले, त्यांच्याकडील दागिने आणि कॅश घेतल्यानंतर त्यांनी त्यांना एटीएममधून पैसे काढण्यास सांगितले, मात्र एटीएममधून पैसे निघत नसल्याने त्यांनी त्यांना पुन्हा रिक्षात बसविले, त्यानंतर ते अंधेरीच्या दिशेने निघून गेले. अंधेरी येथे आल्यानंतर या दोघांनी त्यांना सोडून तेथून पळ काढला. घडलेल्या प्रकारानंतर त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध अपहरणासह लुटमारीचा गुन्हा नोंदविला आहे, सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस रिक्षासह दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.