बेस्टकडून मुंबईकरांसाठी एक आनंददायी बातमी आहे. लवकरच बेस्टच्या ताफ्यात २६ नवीन इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट होणार आहेत. फेम इंडिया योजनेंतर्गत बेस्ट उपक्रमाला या बस पुरवण्यात येतील. फेम म्हणजे फास्टर अॅडॉप्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग इन इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया ही योजना केंद्र सरकारची आहे. योजनेच्या केंद्र पुरस्कृत टप्प्याअंतर्गत ३०० पैकी २६ इलेक्ट्रिक बसेस पहिल्या तुकडीत देण्यात येणार आहेत. या इलेक्ट्रिक बसेस आरटीओ कार्यालयात आधीच नोंदणीकृत असून लवकरच प्रवाशांच्या सेवेकरीता दाखल होणार आहेत.
ऑक्टोबर अखेरपर्यंत बेस्टकडे ३ हजार ८७५ बसेसचा ताफा होता, त्यात ३८ इलेक्ट्रिक बसेस होत्या. पहिल्या सहा इलेक्ट्रिक बसेस २०१७ मध्ये खरेदी करण्यात आल्या, तर उर्वरित ३२ बसेस फेम इंडिया योजनेच्या फेज १ अंतर्गत भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत.
बेस्ट अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व नवीन सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या नवीन इलेक्ट्रिक बसेस ध्वनीमुक्त आहेत आणि पारंपारिक बसेसप्रमाणे एक्झॉस्ट मधून गॅस उत्सर्जित करत नाहीत. या नव्या इलेक्ट्रिक बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास प्रदुषणमुक्त होणार आहे.