मुंबई :- टीआरपी घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन खाजगी चॅनेल्सच्या मालकांना स्थानिक न्यायालयाने गुरुवारी प्रत्येकी पन्नास हजाराचा जामिनावर सोडून दिले. त्यात बॉक्स सिनेमाचे मालक नारायण नंदकिशोर शर्मा आणि फक्त मराठीचे मालक शिरीष सतीश पत्तनशेट्टी यांचा समावेश आहे. टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशाल भंडारी याला अटक केली होती, त्याच्या चौकशीत बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठीचे चॅनेल्स मालक नारायण शर्मा आणि शिरीष पत्तनशेट्टी यांचा सहभाग उघडकीस आला होता.
टीआरपी वाढविण्यासाठी या दोघांनी हंसा कंपनीच्या काही माजी अधिकार्यांशी हातमिळवणी करुन हा घोटाळा केल्याचे उघडकीस येताच ९ ऑक्टोंबरला या दोघांनाही नंतर पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर ते दोघेही न्यायालयीन कोठडीत होते, त्यानंतर त्यांनी स्थानिक न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या जामिन अर्जावरील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली आणि नारायण शर्मा व शिरीष पत्तनशेट्टी यांना न्यायालयाने प्रत्येकी ५० हजाराच्या जामिनावर सोडून दिले.
याच गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नारायण शर्मा, शिरीष पत्तनशेट्टी, विशाल भंडारीसह बोमपेल्लीराव नारायण मिस्त्री, विनय राजेंद्र तित्रपाठी, उमेश चंद्रकांत मिश्रा, रामजी दुधनाथ शर्मा, दिनेशकुमार पन्नालाल विश्वकर्मा, हरिष कमलाकर पाटील आणि अभिषेक भजनदास कोलवडे ऊर्फ अजीत ऊर्फ अमीत ऊर्फ महाडिक यांचा समावेश आहे. यातील अभिषेक हा सध्या पोलीस तर इतर सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत होते, त्यापैकी दोघांना गुरुवारी न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. या सर्वांच्या चौकशीत एका चॅनेल्सच्या बँक खात्यात तीन महिन्यांत सत्तर ते ऐंशी कोटी रुपये जमा झाल्याचे उघडकीस आले होते, या संपूर्ण व्यवहाराची सध्या गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. दुसरीकडे याच गुन्ह्यांत रिपब्लिक टिव्ही, न्यूज नेशन आणि महामूव्ही चॅनेलचे मालक, चालक तसेच चॅनेल्सशी संबंधित व्यक्तींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.