मुंबई :- इमिटेशन ज्वेलरी मालकाला खंडणीसाठी धमकाविणार्या दोघांना कुरार पोलिसांनी अटक केली. संजय पांडे आणि अजीत सिंग अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा त्यांचा तिसरा सहकारी पप्पू नेपाळी हा पळून गेला असून त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
तिन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यातील तक्रारदार मालाड परिसरातील एका इमिटेशन ज्वेलरी कारखान्यात कामाला आहे. या कारखान्यात त्याच्यासह इतर वीस कर्मचारी कामाला आहेत. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सहा वाजता सर्व कर्मचारी कामात असताना अचानक तिथे तीन तरुण आले, या तिघांनी तक्रारदाराला त्याच्या मालकाविषयी विचारणा करुन त्याच्याकडे खंडणीची मागणी केली. दरमाह खंडणीची रक्कम दिली नाहीतर त्यांना तिथे व्यवसाय करता येणार नाही अशी धमकी दिली. या तिघांकडून चॉपरसह गावठी कट्टा होता, घातक शस्त्रांच्या धाकावर या तिघांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देत पैसे तयार ठेवण्यास सांगितले. जाताना त्यांनी तक्रारदारांना मारहाणही केली होती.
या घटनेनंतर त्याने ही माहिती त्याच्या मालकासह कुरार पोलिसांना दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध खंडणीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या पथकाने मालाड परिसरातून संजय पांडे आणि अजीत सिंग या दोघांना अटक केली. यातील संजयविरुद्ध बारा तर अजीतविरुद्ध सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तिसरा सहकारी पप्पूविरुद्ध आठ गुन्ह्यांची नोंद आहे, त्यात खंडणीसह गंभीर दुखापत, हत्येचा प्रयत्नाचा समावेश आहे. या दोघांनी या मालकाला खंडणीसाठी धमकी दिल्याची कबुली दिली. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांच्या तिसर्या सहकार्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.