मुक्तपीठ टीम
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. चौदा दिवसांच्या युद्धात रशियाने युक्रेनचे कंबरडे मोडले आहे. पण कणा शाबूत ठेवत आजही युक्रेन शरण आलेला नाही. मात्र, आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी नाटोमध्ये सामील होण्याचा आग्रह आपण धरणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे रशियाला युद्धासाठी निमित्त मिळवून देणाऱ्या मुद्द्यापासूनच ते दूर झाले आहेत. त्यामुळे आता तडजोडीची शक्यता निर्माण झाली असून जगाची युद्ध आणि महागाईच्या भडक्यातून सुटका होण्याची शक्यता आहे.
झेलेन्स्कीची तडजोडीची भूमिका?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भूमिका काहीशी नरमताना दिसत आहे.अमेरिकन प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये त्यांनी मांडलेल्या भूमिकेतून तसं सूचित होत आहे. झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेन आता नाटोमध्ये सामील होण्याचा आग्रह धरणार नाही. नाटोला आता ते नको आहेत, असेही ते म्हणालेत. रशिया वारंवार युक्रेनला नाटोपासून दूर राहण्यास सांगत आहे. यादरम्यान त्यांनी डोनेस्तक आणि लुहान्स्क करारांवरही विचार करण्याचे संकेतही दिले आहेत.
रशियावरही वाढते निर्बंध
दरम्यान, रशियावरील निर्बंध वाढतच आहेत. अमेरिका रशियाकडून कच्चे तेल आणि वायू आयात करणार नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी स्पष्ट केले आहे. ब्रिटननेही तसे जाहीर केले आहे. दरम्यान, मॅक़ोनाल्ड आणि इतर अमेरिकन कंपन्यांबरोबरच पेप्सिकोनेही रशियातील उत्पादन आणि विक्रीही बंद केली आहे.
चीनची अमेरिकेवर टीका केली
रशियावर आणखी एक निर्बंध लादतानाच अमेरिकेने कच्च्या तेल आणि वायूच्या आयातीवर बंदी घातली आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने टीका केली आहे. रशियाने आधीच म्हटले आहे की तेल आयात बंद केल्यास युरोपियन बाजारपेठेत तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ होईल.
झापोरिझिया अणु प्रकल्पातील कर्मचारी रशियाकडून ओलीस!
रशियाने नुकताच युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या झापोरिझिया अणु प्रकल्पावर हल्ला केला. त्यानंतर युक्रेनच्या ऊर्जामंत्र्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की रशियन सैनिकांनी अणु प्रकल्पातील चार कर्मचार्यांना ओलीस ठेवले आहे आणि त्यांना प्लांटमध्ये छेडछाड करण्यास भाग पाडले आहे. हे त्वरित थांबवायला हवे, असे ते म्हणाले.
युक्रेन संकटाला नाटो जबाबदार – व्हेनेझुएलाचे अध्यक्ष
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष युक्रेनच्या संकटासाठी नाटोला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की, नाटोचा विस्तार करून पाश्चिमात्य देशांनी रशियाला चिथावले आहे. हे सर्व देश अनेक दशकांपासून रशियाला धमकावत राहिले. त्यामुळे सध्याच्या संकटाला हेच देश जबाबदार आहेत.