मुक्तपीठ टीम
भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर युवक क्रांती दल पदाधिकारी व सक्रीय सदस्यांची बैठक मंगळवार, २५ ऑक्टोबर २०२२ रोजी पार पडली. सखोल चर्चेअंती निश्चित करण्यात आलेली भूमिका पुढीलप्रमाणे आहे:
लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, जातीअंत, स्त्रियांचा आदर, वंचित आणि सर्वहारा वर्गाचा विकास ही मूल्ये जोपासणारी तसेच आक्रमक अहिंसेच्या मार्गाने, सत्याग्रही पद्धतीने राजकीय व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी कटिबद्ध असणारी युवक क्रांती दल ही एक राजकीय चळवळ आहे. १९६७ साली स्थापन झालेल्या या संघटनेला यशस्वी झालेल्या अनेक आंदोलनांचा अनुभव आहे. सध्या भारतीय समाजाला धर्माच्या, जातीच्या, वंशाच्या, भेदानुसार दुभंगण्याच्या प्रयत्न पद्धतशीरपणे चालू आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ क्षीण केले जात आहेत. हुकूमशाहीची पाळेमुळे रुजविण्यासाठी विरोधी पक्षांचा आणि विरोध करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आवाजही दाबला जात आहे. शेतकन्यांचा प्रदीर्घ लढा असो किंवा नागरिकत्वाच्या प्रश्नांवरचे आंदोलन असो, ते दाबून टाकण्याचा आटोकाट प्रयत्न झालेला आपण पाहिला आहे. सत्ता, संपत्ती आणि अधिकार यांचे केंद्रीकरण सुरू आहे. आर्थिक विकास हा निवडक वर्गाच्या लाभासाठी आणि वंचितांची पिळवणूक करणारा आहे. या पार्श्वभूमीवर ‘आम्ही भारताचे लोक एकत्र येऊन संघटीत लढा उभा करणे आवश्यक आहे. या दृष्टीने भारत जोडो यात्रेचे महत्त्व युक्रांदला वाटते. यापूर्वी श्रमर्षी बाबा आमटे आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या भारत यात्रांमध्ये युवक क्रांती दलाचा सक्रीय सहभाग होता. संघटनेचे संस्थापक मा. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी या यात्रेच्या संयोजनामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती.
सध्या सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणारे राहुल गांधी जे जे प्रश्न उपस्थित करीत आहेत, ते ते शेतकन्यांच्या, आदिवासींच्या, बेरोजगार युवक-युवतींच्या जीवनाशी भिडणारे आहेत. म्हणूनच युवक क्रांती दलाचा या यात्रेला पाठिंबा तर आहेच, शिवाय आम्ही युक्रांदीय या भारत जोडो यात्रेमध्ये सक्रीयरीत्या सहभागी होत आहोत. समाजातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन युवक क्रांती दल करीत आहे.