मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या काळात लोकांची दिशाभूल करणारे मजकूर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच पार्श्वभूमीवर गुगलच्या मालकीच्या यूट्यूबने आता मोठी कारवाई केली आहे. यूट्यूबने दिशाभूल करणाऱ्या आणि चुकीची माहिती पसरवणारे १० लाख व्हिडीओ हटवले आहेत. कंपनीने माहिती दिली आहे की, फेब्रुवारी २०२० पासून यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून चुकीची माहिती, खोटे उपचार किंवा फसवणुकीशी संबंधित १० लाख व्हिडीओ हटवले गेले आहेत.
यूट्यूबचे प्रॉडक्ट ऑफिसर नील मोहन यांनी बुधवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, यूट्यूबवर कोरोना महामारीशी संबंधित लाखो व्हिडिओ आहेत, परंतु यातील काही व्हिडीओ आमच्या धोरणाचे उल्लंघन करतात. सुमारे १० लाख असे व्हिडीओ हटवण्यात आले आहेत. चुकीची माहिती मुख्य प्रवाहात येऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यूट्यूब दर तीन महिन्यांनी १० लाख व्हिडीओ हटवते
- यूट्यूबचे प्रॉडक्ट ऑफिसर नील मोहन यांनी सांगितले की, यूट्यूब प्रत्येक तिमाहीत सुमारे १० लाख व्हिडीओ हटवते, त्यापैकी बहुतेक व्हिडीओंना १० पेक्षा कमी व्हूज असतात.
- चुकीच्या माहितीच्या व्हिडीओंचा प्रसार कमी करण्यासाठी यूट्यूब हे करते.
- कोरोनाच्या संदर्भात, आम्ही सीडीसी आणि डब्ल्यूएचओ सारख्या आरोग्य संस्थांच्या तज्ज्ञांच्या सहमतीवर अवलंबून आहोत.
- उल्लेखनीय म्हणजे, फेसबुक आणि ट्विटरने सोशल मीडियावर कोरोना महामारीशी संबंधित दिशाभूल करणारा प्रचार, चुकीची माहिती आणि उपचारांचे खोटे दावे रोखण्यासाठी आणि वेळोवेळी अशी सामग्री काढून टाकण्यासाठी धोरण बनवले आहे.