गौरव भंडारे
सोलापूरचा अक्षय जाधव हा नव्या वर्षात नव्या मोहिमेवर निघाला. सध्या देशातील शैक्षणिक क्षेत्रात माजलेली बजबजपुरी अक्षयला अस्वस्थ करत होती. त्यातही शिक्षणाचंही बाजारीकरण झाल्यामुळे गरीबांना शिक्षणाचा हक्क डावलला जातोय की काय, हे त्याला बोचते. त्यातूनच सर्वांसाठी मोफत आणि समान दर्जाचं चांगलं शिक्षण मिळावे असं त्याला वाटले. मात्र, तो केवळ मनात वाटून घेण्यावरच थांबला नाही तर शिक्षणाच्या राष्ट्रीयकरणासाठी सर्वोच्च न्यायालयाला पाठवण्यासाठी पाच लाख पत्रे जमा करु लागला. त्यातूनच त्याने सायकल यात्रा सुरु केली. आता कोरोना निर्बंधांमुळे स्थगित केलेली यात्रा तो पुन्हा सुरु करणार आहे.
अक्षय जाधवच्या शब्दात त्याच्या सायकल यात्रेमागील भावना
एक जानेवारीला सावित्री माय आणि ज्योति बा या यांनी देशात प्रथम स्त्रियांसाठी शाळा सुरु केली. समाजातील सर्वांसाठी शिक्षणाचा ज्ञानमार्ग खुला केला. या दिनाचं औचित्य साधून मी शिक्षणाचं राष्ट्रीयकरण या मुद्द्यावर मोहीम राबवत आहे. शिक्षणाविषयी जनजागृतीसाठी सायकल यात्रा काढली. आता कोरोनामुळे थांबवली असली तरी ती पुन्हा सुरु करणार आहे.
शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून पाहिले जाते. तसेच या धंदेवाईकपणामुळे सर्वसामान्य उच्च शिक्षण घेऊच शकत नाही ही गोष्ट मला खूप अस्वस्थ करते.
एक जानेवारीपासून मी आठवडाभर महाराष्ट्र भ्रमंती केली आणि भ्रमंती करत 5 लाख शिक्षणाचे राष्ट्रीयकरणाचे पत्र गोळा करणे हे देखील काम चालू आहे. त्याच सोबत बाजारीकरणामुळे शिक्षणही सर्वसामान्यांच्या कुवतीबाहेर जात आहे. त्यामुळे पुन्हा सामान्यांचा शिक्षणाचा हक्क डावलला जात आहे. समाजाच्या उद्धारासाठी शिक्षणातच आशेचा किरण दिसत असताना आपल्याला सामान्यांचा शिक्षणाचा हक्क शाबूत ठेवावाच लागेल.
शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे देश अधोगतीकडे खूप तीव्र वेगाने वळू लागला आहे, असे वाटते. माझा प्रामाणिक प्रयत्न असेल पाच लाख भारतीयांच्या स्वाक्षऱ्या हस्ताक्षर असलेले पत्र न्यायव्यवस्थे समोर मांडायचं. त्यातून भारतीय जनतेची शिक्षणाचा हक्क डावलल्याने होणारी हानी दाखवून देऊन न्यायाची अपेक्षा करायची. देशाच्या भल्यासाठी देशातील प्रत्येकाचं भलं होणं आवश्यक आहे, त्यासाठी शिक्षणाचं राष्ट्रीयकरण होणं खूप गरजेचे आहे. ही सायकल यात्रा पाच लाख पत्र जमेपर्यंत चालूच राहील.
कोरोनाचा व्यत्यय, सध्या यात्रा स्थगित
ही सायकल यात्रा मला सात जानेवारीला स्थगित करावी लागली, त्याचे कारण ओमायक्रॉनचा वाढता फैलाव हे आहे. संसर्ग टाळायचा उद्देश योग्य असल्याने मीही माझी सायकल यात्रा सध्या स्थगित करत आहे. कोरोना आटोक्यात येताच मी पुन्हा पाच लाख जमा करण्याच्या मोहिमेवर सायकलवरुन निघणारच!
सहा दिवसांमध्ये जे काही अनुभव आले ते अफलातूनच!
- लोकांनी या मोहिमेविषयी खूप प्रेम व्यक्त केले.
- एक नवा आशेचा किरण त्यांच्या मनी जागा झाला.
- लोक पुढाकार घेऊन या मोहिमेसाठी पत्र लिहून पोहच करू लागले.
- अशिक्षित तसेच शिक्षित लोक ही या भारताला उज्वल भविष्याची अपेक्षा ठेवतात.
- या अल्पावधीतच २ ते ३ हजार पत्र गोळा झाली.
- ती पत्रे आपण लवकरच आपल्या सरकारला पाठवणार आहोत.
- हा लढा विजयी होई पर्यंत चालूच राहिल.
- न्यायव्यवस्थेला आणि सरकारला या लेखी स्वरूपात असणाऱ्या जनआंदोलनाची दखल लोकशाही पद्धतीने घ्यावीच लागेल.
देशातील प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा हक्क मिळणारच!
पाहा व्हिडीओ: