मुक्तपीठ टीम
कोरोनाविरोधातील युद्ध सारेच लढत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीनं त्यात वाटा उचलताना दिसत आहेत. त्यात आता कोरोना रुग्णांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी योग क्षेत्रात कार्यरत काही संस्था पुढे सरसावल्या आहेत. अशा संस्थांपैकीच एक असणाऱ्या मुंबईतील द योग इंस्टिट्यूटने एक निःशुल्क योग उपक्रम सुरु केला आहे. कोरोना रुग्णांच्या तब्येतीला लवकरात लवकर आराम पडावा, त्यांना त्यांचे सर्वसामान्य जीवन पुन्हा सुरु करता यावे यासाठी त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या अनोख्या उपक्रमाची सुरुवात ९ मे २०२१ रोजी करण्यात आली. कोरोना रुग्णांची तब्येत बरी व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प द योग इन्स्टिटयूटने केला असून त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील मुंबईतील कोळे कल्याण पोलीस प्रशिक्षण केंद्र येथील कोरोना सेंटरमध्ये प्रशिक्षक स्वतः जाऊन हा उपक्रम चालवत आहेत. यामध्ये क्लासिकल योग विद्येमध्ये उच्च प्रशिक्षण घेतलेले, द योग इन्स्टिट्युटने प्रमाणित केलेले आणि स्वतः माँ डॉ हंसाजी योगेंद्र यांनी ज्यांना योग ज्ञान प्रदान केले आहे असे योग शिक्षक योग शिबिरे घेत आहेत.
हा उपक्रम कोरोना रुग्णांचे शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयोगी ठरेल, त्याबरोबरीनेच मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या देखील त्यांना अधिक जास्त सक्षम व समर्थ बनवेल.
गरजेच्या वेळी लोकांची मदत करण्यात द योग इन्स्टिटयूट आघाडीवर असते. योग विद्येची माहिती आणि लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत या एकमेव उद्देशाने द योग इन्स्टिटयूटने आज अनेक निःशुल्क योग उपक्रम चालवले आहेत. अगदी सध्याच्या कोरोना काळात देखील योगाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे आणि त्याचे लाभ लोकांनां मिळवून देण्याचे त्यांचे प्रयत्न अतिशय निष्ठेने सुरु आहेत आणि यामध्ये त्यांनी कोरोना रुग्णांच्या आरोग्यासाठीच्या प्रयत्नांचा देखील समावेश केला आहे.
१९१८ साली महान योग गुरु श्री योगेंद्र जी यांनी द योग इन्स्टिटयूटची स्थापना केली. “घरगुती योग” ही संकल्पना रुजवण्यासाठी, तिचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली, जगातील प्रत्येक घराघरात योग विद्या पोहोचावी आणि प्रत्येक व्यक्तीला तिचे लाभ मिळावेत हा त्यांचा उद्देश होता. द योग इन्स्टिटयूटच्या संचालिका डॉ माँ हंसाजी योगेंद्र या त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे चालवत आहेत. विलक्षण प्रभावी व्यक्तिमत्त्व, योग विद्या, ज्ञान आणि प्रज्ञा यांची अद्भुत देणगी लाभलेल्या डॉ. माँ हंसाजी योगेंद्र यांना सर्वांसाठी अतिशय आदरणीय आहेत.