मुक्तपीठ टीम
बेळगावातील हुतात्मा दिनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभागासंदर्भात केलेल्या सरळस्पष्ट वक्तव्यामुळे कर्नाटकात त्यांच्याविरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोहचवला अशी टीका केली आहे. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा सामना करणाऱ्या सीमाभागातील मराठी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पांनी महाराष्ट्रांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संघराज्याच्यांची तत्वं सांगणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. आजवर मराठी माणसांना, भाषेला, संस्कृतीला सातत्याने दडपून त्यांच्या संवैधानिक अधिकारांचा भंग करणाऱ्या कन्नड नेत्यांना अशा तत्वांची भाषा वापरण्याचा अधिकारच नाही, असेही या कार्यकर्त्यांनी बजावले आहे.
“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सामाजिक सौहार्द बिघडवण्याची भाषा करणं ही अतिशय खेदाची बाब आहे. उध्दव ठाकरेंच्या वक्तव्यांमुळे सीमेवरील जिल्ह्यांमधील वातावरण बिघडू शकते. एक सच्चा भारतीय म्हणून उद्धव ठाकरे यांनी संघराज्याच्या तत्त्वांबाबत बांधिलकी व आदर बाळगाव, अशी माझी अपेक्षा आहे,” असा आव आणतानाच “कर्नाटकाची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे चिथावणीखोर विधानही येडियुरप्पा यांनी केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या कोणत्या वक्तव्यामुळे झाला वाद?
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील शहिदांना अभिवादन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच, असे ठणकावून सांगितले होते.
“महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबीयांना मानाचा मुजरा..!
कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!”, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या अभिवादन संदेशात नमूद केले आहे.