रोग्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सना देवाचे स्थान दिले जाते. याची प्रचिती यवतमाळमधील एका गरीब शेतकऱ्याला आली आहे. डॉ. निलेश येलनारे यांनी गणेश वासाके या तरुण शेतकऱ्यावर अवघड शस्त्रक्रिया केली आहे. वासाके हे खांद्याच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना मोठ्या शहरातील महागडी शस्त्रक्रिया परवडत नव्हती. त्यामुळे नातेवाईकाच्या सांगण्यावरून वासाके डॉ. येलनारे यांच्याकडे गेले. डॉ. येलनारे नुकतेच बंगळुरुच्या रमैया इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्स ट्रेनिंग सेंटर तर्फे ‘शोल्डर अँड नी आर्थ्रोस्कोपी’ वर अभ्यास करून परतले आहेत.
डॉ. येलनारे आणि त्यांच्या टीमने वासाके यांच्या खाद्यांची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेतून आयात करण्यात आलेल्या २. ८ मिमीच्या दोन अँकरचा वापर करून वासाकेंचा खांदा पुन्हा बसवण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे डॉ. येलनारे यांनी सांगितले.
शस्त्रक्रियेनंतर गणेश वासाके यांनी डॉ. येलनारे आणि त्यांच्या टीमचे आभार मानत म्हंटले की, डॉक्टरांनी माझ्यावर केलेल्या शस्त्रक्रियेसाठी माझ्याकडून एकही पैसा घेतला नाही. त्यांनी मला फक्त हॉस्पिटलमध्ये भरती होण्यास सांगितले.” माणूसकीला प्रधान्य देणाऱ्या डॉ. येलनारे यांच्यामुळे या तरुण शेतकऱ्याला पुन्हा एकदा पूर्वीसारखं जीवन जगणं शक्य होणार आहे.