मुक्तपीठ टीम
महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना दर्जा आणि संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी महिला धोरण २०१४ मध्ये आवश्यक त्या सुधारणा करून सुधारीत सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार आहे. महिला धोरणाच्या मसुदा निर्मितीमधे समाजातील सर्व घटकांच्या अभिप्राय व सूचनांचा विचार होणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
सुधारीत महिला धोरणाच्या मसुद्याचे सादरीकरण बैठक महिला व बाल विकास मंत्री, ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. सुधारीत चौथ्या महिला धोरणाबाबत प्रारूप मसुदा सादरीकरण व चर्चा या बैठकीत करण्यात आली.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, या धोरणाच्या मसुद्याबाबत आपण नऊ समिती तयार केल्या होत्या. या समितीतील सदस्यांचे अभिप्राय आणि सूचना या मसुद्यात घेतले आहेत. शासनाच्या विविध विभागांना महिला धोरणाचा मसुदा पाठविला होता. यामध्ये बऱ्याच विभागांनी आपले अभिप्राय व सूचना कळविले आहेत. काही विभागांचे अभिप्राय अद्याप अप्राप्त आहेत, त्यांचे अभिप्राय दहा दिवसाच्या आत मागवावे असे निर्देश यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांनी संबंधितांना दिले.
सर्वसामान्य नागरिकांच्या धोरणाबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी ग्रामस्तरावर हे धोरण प्रसिद्ध करावे. विभागस्तरावर याबाबत आढावा घ्यावा. सर्व राजकीय पक्ष, महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांना या धोरणाचा मसुदा पाठवावा व त्यांचे ही अभिप्राय घ्यावेत. सर्व विभागांनी या धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबत आपण जबाबदारी दिली आहे. त्यामुळे सर्वांचा यामध्ये सहभाग असणार आहे,असेही मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, आयुक्त, महिला व बालविकास राहूल मोरे, उपायुक्त दिलीप हिवराळे उपस्थित होते.