मुक्तपीठ टीम
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांनंतर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणांवर पलटवार करताना त्यांनी आरोपांच्या फैरी झाल्या, मेळघाटातील बालमृत्यूप्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आहे. काही कंत्राटदारांच्या प्रेमापोटी आज राज्यातील तमाम अंगणवाडी ताईंचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचं नाव खराब करायचं काम राणा यांनी केलं आहे, तसेच या संपूर्ण प्रकारामुळे आपण प्रचंड व्यथित असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
मी मंत्री झाल्यापासून कुपोषणाविरोधात व्यापक चळवळ!
- “सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र” अशी घोषणा देऊन राज्य सरकारने जे काम केलं त्याला गेल्या वर्षी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी स्वतः पहिल्या क्रमांकाचं बक्षिस देऊन गौरवलं आहे.
- तरीही एकही बालक कुपोषित राहता कामा नये म्हणून आपण पोषण अभियानाची जनजागृती चळवळ वर्षभर राबवत आहोत.
- कोरोना काळातही कड्याकपाऱ्यातून अंगणवाडी ताई-पर्यवेक्षिका दुर्गम भागात जाऊन पोषण आहार पोचवत आहेत.
- मेळघाटात मी स्वतः अनेक दौरे केले आहेत.
- तिथे मुक्काम करून सर्व यंत्रणा कशी जोमाने काम करेल यासाठी प्रयत्न केले आहे.
“आदिवासी भागात फक्त फोटसेशनची चमकोगिरी करणाऱ्या नवनीत राणा!”
- पण आज चमकोगिरी करत आदिवासी भागात फक्त फोटसेशन आणि क्रिकेट खेळायला जाणाऱ्या नवनीत राणा यांनी सर्व आदिवासी समाज, अमरावतीकर यांचा अपमान केला आहे अशी टिका ही त्यांनी यावेळी केली.
- तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातही बालमृत्यूंचं प्रमाण कमी येऊ शकलं नव्हतं.
- आता ज्या ४९ बालमृत्यूच्या बातम्या येत आहेत त्याप्रकरणात शासनाने याआधीच उच्चस्तरीय चौकशी लावलेली आहे.
- फक्त चमकोगिरी करायची यासाठीच नवनीत राणा यांचा सगळा आटापिटा असल्याचं दिसतंय.
ज्यांनी मागासवर्गीयांचा अधिकार मारला, त्यांचाच कुठल्या कंत्राटदारासाठी आटापिटा?
- खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे ज्यांनी मागासवर्गीयांचा अधिकार मारला असा ज्यांच्यावर आरोप आहे, आदिवासींच्या जमीनी लाटल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, त्यांना आदिवासींबाबत आताच का प्रेम उफाळून आलंय ?
- कुठल्या कंत्राटदारांसाठी हा आटापिटा सुरू आहे?
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या निकषांच्या आधारे पोषण आहाराचं काम देण्यात आले होते, कोरोनामुळे काम ठप्प पडू नये म्हणून तीच रचना कायम ठेवण्यात आली होती.
- कोरोना काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या अंगणवाडी ताई-पर्यवेक्षिका आणि समस्त अमरावतीकरांचा नवनीत राणा यांनी अपमान केला आहे.
- त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
“राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात ८०० कोटींचा महाघोटाळा”