मुक्तपीठ टीम
जागतिक बँकेने अत्यंत गरीब व्यक्तीची (बीपीएल) व्याख्या बदलली आहे. नवीन मानकांनुसार, आता दररोज २.१५ डॉलर म्हणजेच १६७ रुपये कमावणारी व्यक्ती अत्यंत गरीब मानली जाईल, तर सध्यापर्यंत १.९० डॉलर म्हणजेच १४७ रुपये प्रतिदिन कमावणारी व्यक्ती अत्यंत गरीब मानली जाते. महागाई, राहणीमानाच्या खर्चात झालेली वाढ, अत्यंत दारिद्र्यरेषेसह अनेक बाबींच्या आधारे जागतिक बँक वेळोवेळी डेटा बदलते. २०११ च्या तुलनेत २०१९ मध्ये भारतातील बीपीएलची स्थिती १२.३% ने कमी झाली आहे.
७० कोटींहून वाढण्याची शक्यता…
२०१७ च्या किमती वापरून नवीन जागतिक दारिद्र्यरेषा २.१५ डॉलरवर निर्धारीत केली आहे. याचा अर्थ असा की दररोज २.१५ डॉलर पेक्षा कमी जीवन जगणारे अत्यंत गरिबीत जगत असल्याचे मानले जाते. २०१७ मध्ये, जागतिक स्तरावर केवळ ७० कोटी लोक या स्थितीत होते. मात्र सध्या ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
व्याख्या का बदलायची गरज?
जगभरातील किंमतींमध्ये होणारे बदल प्रतिबिंबित करण्यासाठी जागतिक दारिद्र्यरेषा वेळोवेळी बदलली जाते. आंतरराष्ट्रीय दारिद्रयरेषेतील वाढ हे २०११ तो २०१७ या कालावधीत कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये उर्वरित जगाच्या तुलनेत मूलभूत अन्न, कपडे आणि घरांच्या गरजांमध्ये वाढ दर्शवते. दुसऱ्या शब्दांत, २०१७ किमतींवरील २.१५ डॉलरचे वास्तविक मूल्य २०११ च्या किमतींवरील १.९० डॉलर इतकेच आहे.
भारतातील गरिबी कमी होतेय!
२०११ च्या तुलनेत २०१९ मध्ये भारतातील बीपीएलची स्थिती १२.३% ने कमी झाली आहे. याचे कारण म्हणजे ग्रामीण भागातील गरिबीत घट म्हणजेच उत्पन्न वाढले आहे. २०१९ मध्ये ग्रामीण भागातील अत्यंत गरीबांची संख्या निम्म्याने घसरून १०.२% झाली आहे, त्यात तुलनेने तीव्र घट झाली आहे. तर २०११ मध्ये ते २२.५% होते. मात्र, हे बीपीएलसाठी जागतिक बँकेच्या १.९० डॉलरच्या दैनंदिन कमाईवर आधारित आहे.
छोट्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ
लहान शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. दोन सर्वेक्षण फेऱ्यांदरम्यान सर्वात कमी मालकी असलेल्या शेतकऱ्यांच्या वास्तविक उत्पन्नात १० टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. तर या कालावधीत मोठी होल्डिंग असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ दोन टक्क्यांनी वाढले आहे.
दारिद्र्यरेषा कुठे वापरली जाते?
जागतिक दारिद्र्यरेषेचा वापर प्रामुख्याने जागतिक स्तरावर अत्यंत गरिबीचे निरीक्षण करण्यासाठी आणि जागतिक बँक, संयुक्त राष्ट्र आणि इतर विकास भागीदारांनी निश्चित केलेल्या जागतिक उद्दिष्टांवर प्रगती मोजण्यासाठी केला जातो. एखाद्या देशाची राष्ट्रीय दारिद्र्यरेषा ही गरीबांपर्यंत पोहोचण्यासाठी धोरणात्मक संवाद किंवा लक्ष्यीकरण कार्यक्रमांसाठी अधिक योग्य आहे.
दारिद्र्य रेषा म्हणजे काय?
- दारिद्र्यरेषा ही उत्पन्नाची पातळी आहे, जिथून एखादी व्यक्ती कमी उत्पन्नामुळे त्याच्या भौतिक गरजा पूर्ण करू शकत नाही.
- दारिद्र्यरेषा देशानुसार बदलते.
- उदा, अमेरिकेतील दारिद्र्यरेषा भारतातील स्वीकृत दारिद्र्यरेषेपेक्षा खूप जास्त आहे.