रोहिणी ठोंबरे
कला आणि परंपरा. दोन्ही एकत्र जिथं नांदतात अशी एक मुंबईतील जागा म्हणजे मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान.
धकाधकीच्या जीवनात थोडासा दिलासा घेण्यासाठी अंधेरीतील या शिल्पग्राम उद्यानाला नक्कीच भेट दिली पाहिजे. शिल्पग्राम उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकेकाळी महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या १२ बलुतेदारांची शिल्प देखील आहेत. त्याच प्रमाणे कथ्थक, भरतनाट्यम, कुचीपुडी, भांगडा, गरबा यासह लावणीसारख्या भारतीय नृत्य शैलींच्या शिल्पांचाही समावेश याठिकाणी आहे. या उद्यानाला भेट देणाऱ्या तरूणाईला येथून काही तरी नवीन माहिती मिळते आणि बरेच काही शिकता येते. तसेच याठिकाणी भेट दिल्यावर अगदी मस्त आणि ताजेतवाणे वाटते.
शिल्पग्राम उद्यानात अनेक फळ झाडं आणि फुल झाडं पाहायला मिळतात यामुळे सर्व वातावरण अगदी प्रसन्न आणि मनमोहक राहतं. वृद्ध लोक येथे एकत्र जमतात, व्यायाम करतात. एकत्र हसतात. त्यांच्या उतार वयात शिल्पग्राम उद्यान हे जीवनातील विरंगुळ्याचं ठिकाण ठरत आहे. हे उद्यान इतके लोकप्रिय आहे की सुट्टीच्या दिवशी येथे भल्या मोठ्या रांगा लागतात.
शिवसेनेचे नेते रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली १३ एकर जमिनीवर शिल्पग्राम उद्यान आकारास आला आहे. या उद्यानात विविध कलाकौशल्यांची ओळख करुन देणारी शिल्पं, संगीत कारंजे, झाडं, लहान मुलांसाठी झोके, घसरगुंडी, मेरि-गो-राऊंउ यासारखी विविध खेळणी आहेत. एवढंचं नाहीतर बसण्याची व्यवस्था अगदी उत्तम करण्यात आली आहे. सगळीकडे लाकडी बाकडे आणि विविध ठिकाणे जोडणारे वॉकिंग ट्रॅक्स व आकर्षक पायवाटा बांधण्यात आल्या आहेत. एकीकडे लहान मुलांना खेळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मोठ्यांचं मन रमेल अशी सुविधा करण्यात आली आहे.
विविध रंगांमधून संगीताच्या तालावर चालणारे संगीतमय कारंजे या उद्यानात उभारण्यात आले आहे. ते पाहून मन अगदी प्रसन्न होते. शिल्पग्राम उद्यान कला, परंपरा आणि वैविधतेने अगदी परिपूर्ण बनलेले आहे.
शिल्पग्राम उद्यानात १२ बलूतेदारांच्या कलाकृती सादर करण्यात आल्या आहे. देशाच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे बारा बलुतेदारांची घरं, त्यांची कामं, खेळ, नृत्य यांची शिल्पं या उद्यानात उभारण्यात आले आहे. आपल्या देशाचा इतिहास आणि संस्कृती यांची माहिती देणारे हे शिल्प पाहून तरुणाई आणि वृद्ध हरखून जातात. या शिल्पग्रामाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून येथे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
बारा बलुतेदार म्हणजे काय?
- महाराष्ट्र हे राज्य शेतीप्रधान राज्य आहे.
- पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तु-विनिमय पद्धत अस्तित्वात होती या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता.
- म्हणजेच शेतकरी हा धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकऱ्यास व इतरांस सेवा पुरवत असत.
- यामध्ये जे शेतकऱ्याच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवत त्यांना अलुतेदार (नारू) तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार (कारू) असे म्हणत.
- हे गावाचे वतनदार असत आणि पिढ्यान्पिढ्या तेच ठराविक काम करीत.
- या बलुतेदार पद्धतीत वस्तू सेवा विनिमय असे. यामुळे गावं ही स्वयंपूर्ण होती. पुढे जाती व्यवस्थेचं स्वरुप प्राप्त झाल्यामुळे पद्धत नासली असं म्हटलं जातं.
हे बारा बलुतेदार…
- कुंभार
मातीची भांडी तयार करणे, हा व्यवसाय. - कोळी
मासेमारी हा कोळी समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. - गुरव
गुरव हे देवळात देवाची पूजा करून घरोघरी बेलपत्री पोचविण्याचे काम करत. - चर्मकार
चामड्याच्या वस्तू तयार करणे. चपला-बूट बनवणे. हे व्यवसाय. - मातंग-
दोरखंड बनविणे, झाडू, घराची तोरणे बनवणे हे व्यवसाय. - सोनार
दागदागिने तयार करणे हा व्यवसाय. - नाभिक
केस कापणे, दाढी करणे. जावळ काढणे. - परीट
कपडे धुण्याचा व्यवसाय. - माळी
फुले, फळे, भाज्या, कांदा इत्यादी बागायती पिके काढणे हा मुख्य व्यवसाय करीत असत. - महार
खेडेगावच्या सरहद्दी सांभाळणे, दूत, सफाई कामगार आणि जमीन लवाद. - लोहार-
लोखंडाच्या वस्तू घडविणारे कारागीर म्हणजे लोहार.शेतीची अवजारे बनविणे, विळे, कोयते, सळ्या, प्राण्यांच्या खुरांचे नाळ, कुदळी, घमेली, खिडक्यांचे गज या वस्तू बनवितात. - सुतार
लाकडी वस्तू तयार करणे.