पुण्यातील एक महिला खऱ्या अर्थाने अमर झाली आहे. कारण मृत्यूनंतरही ‘ती’ जीवनदात्री ठरली आहे. ब्रेन डेड झालेल्या या महिलेच्या अवयवांचं दान तिघांना जीवनदान देणारं ठरले आहे.
मेंदूत अंतर्गत रक्तस्राव झाल्याने ५५ वर्षांची एक महिला ब्रेनडेड झाली होती. त्यानंतर या महिलेच्या नवऱ्याने आणि मुलाने गुरुवारी तिचे अवयवदान केले, ज्यामुळे एंड स्टेज यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजार असलेल्या तीन गरजू रूग्णांना जीवनदान मिळाले.
अंतर्गत रक्तस्राव झाल्याने या महिलेला आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी तिला ब्रेनडेड म्हणून जाहीर करण्यात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांकडे संपर्क साधला आणि त्यांनी यकृत आणि मूत्रपिंडांसह तिचे महत्त्वपूर्ण अवयवदान करण्यास सहमती दर्शविली. त्यामुळे एका ४५ वर्षीय व्यावसायिकाला यकृत मिळाले तर दोन रुग्णांना मूत्रपिंड मिळाले.
विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या प्रत्यारोपण समन्वयक आरती गोखले यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी एकूण ३४ ब्रेनडेड व्यक्तींच्या कुटुंबियांच्या सहमतीनंतर अवयवदान केले गेले आहे.