मुक्तपीठ टीम
चित्रपटांमध्ये आपण जसं पाहतो तसचं राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात घडलं आहे. इथल्या दोन कुटुंबांच्या वादाचा परिणाम असा झाला की, त्यांनी दारूच्या दुकानासीठी होणारा लिलावाला ‘इज्जतीचा प्रश्न’ बनवले. त्या कुटुंबांचे प्रतिनिधी असणाऱ्या दोन महिलांनी बघता बघता दारूच्या दुकानाची बोली ५१० कोटींवर जाऊन पोहचवली. दारूच्या लिलावासाठी ही आजवरची सर्वात महाग बोली असल्याचे सांगण्यात येत आहे.
लिलाव झालेल्या दारुच्या दुकानाचे किमान मूल्य ७२ लाख रुपये ठरवण्यात आले होते. राजस्थान राज्यात दारूच्या दुकानाची ऑनलाईन लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याअंतर्गत हनुमानगड जिल्ह्यातील नोहर तहसीलच्या खुयान या गावात ही बोली लावण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाने या बोलीचे किमान मूल्य ७२ लाख रुपये ठेवले होते, परंतु वर्चस्वाच्या लढाईने ती ५ अब्ज १० कोटी १० लाख १५ हजार ४०० रुपये इतक्यावर पोहचली.
रात्री २ वाजेपर्यंत बोली
ऑनलाईन लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हनुमानगडच्या या दुकानाची बोली सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झाली. परंतु एकाच कुटुंबातील दोन महिला प्रियंका कंवर-किरण कंवर यांच्यामध्ये स्पर्धा एवढी रंगली की बोली रात्री २ वाजता संपली. मात्र, तेव्हा ७२ लाखांच्या दुकानाची बोली ५१० कोटी रुपये झाली. विभागाकडून प्राप्त माहितीनुसार ही बोली पूर्वी ६५ लाख रुपयांना विकली गेली होती. उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. जोगाराम यांनी सांगितले की, निविदाकार किरण कंवर यांना या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांना रक्कम तीन दिवसांत जमा करावी लागेल.