मुक्तपीठ टीम
कोरोनाने हजारो संसार उद्ध्वस्त केले. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबच कोलमडून पडले. तसंच घडलं यवतामाळच्या अरुणा अशोक जाधवांच्याबबातीही. कोरोनाने चार महिन्यापूर्वी पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे म्हातारे सासू सासरे, पाच मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी विधवा महिलेवर आली. आभाळाएवढे दु:ख गिळून पती चालवत असलेल्या रिक्षालाच तिने उदरनिर्वाहाचे साधन बनविले.
नेर तालुक्यात परजना नावाचे गाव आहे. गावात अशोक जाधव हा तरुण ऑटो व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. चार महिन्यापूर्वी त्याचे कोरोनाने निधन झाले. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने महिलेवर दु:खाचा डोंगर कोसळला. आता आपले आणि मुलाबाळांचे कसे होणार या चिंतेने अरुणाला ग्रासले. अमृता नावाची मुलगी आठव्या वर्गात, अर्पिता पाचवी, यश चौथीत ,उत्कर्ष सहाव्या वर्गात तर लहान आदर्श अंगणवाडीत शिक्षण घेत आहे. मुलांच्या उज्वल भविष्यासाठी दु:ख बाजूला ठेवत चक्क पती चालवत असलेला ऑटो चालविण्याचा निर्णय घेतला. परजना गावापासून नेर शहराचे ठिकाण २२ किलोमीटर अंतर आहे. येथून प्रवासी नेण्या-आणण्याचे काम महिला करीत आहे. त्यातून तिला दिवसाला किसेबसे दोनशे रुपये हातात पडतात. आपल्या आईला हातभार लागावा म्हणून मोठी मुलगी अमृता घरातील कामे आटोपून शेतात मजुरीला जाते. महिलेला दोन मुली व तीन मुले आहेत. त्यांना पोलिस, सैनिक, अधिकारी, जिल्हाधिकारी व्हायचे आहे. आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाने जबाबदारी घ्यावी, अशी आर्त विनवणी महिलेकडून करण्यात येत आहे.