सरळस्पष्ट
शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव सुरु आहे. विविध रंगांच्या रोषणाईनं मुंबईचं हे ह्रदयस्थळ उजळलंय. तिथंच शुक्रवारी मनसेच्या मंचावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहचले. नव्या आक्रमक हिंदुत्वाच्या अवतारातील मनसेला भाजपा सोबत घेईल अशी शक्यता बराच काळ वर्तवली जाते. पण राज ठाकरेंशी जवळीक दाखवणारे भाजपा नेते युतीची वेळ आली की मनसेला मात्र दूरच ठेवतात. आता तरी शिंदे गटासोबच ते मनसेलाही सोबत घेतात का, अशी चर्चा पुन्हा रंगली आहे.
एखादी मॉड तरुणी गर्लफ्रेंड म्हणून चांगली पण लग्नासाठी ती नकोच, असं काही पुरुषांचं वर्तन असतं. मनसेच्या बाबतीत भाजपाचं वागणं तसंच दिसत आलंय. फ्लर्ट केल्यासारखं भाजपा नेते वागतात. राज ठाकरेंना सतत कुणी ना कुणी भेटत राहतात. उद्धव ठाकरे सत्तेत असताना त्यांना त्रास देण्यासाठी भोंगा विरोधी हनुमान चालिसा आंदोलनही झालं. ते सत्तेवरून जाताच, मनसेनं ते विसरवलं. आता अंधेरी पोचनिवडणुकीत सन्मानजनक माघारीचं निमित्तही राज ठाकरेंच्या पत्रातून मिळवलं. पण निवडणूक आली की राज ठाकरे एकटे पडतात. मनसेकडे भाजपा ढुंकूनही पाहत नाही. जणू सात फेरे घेताना बेभरवशाचा पुरुष गर्लफ्रेंडकडे वळूनही पाहत नाही, अगदी तसंच! विरहवेदनांनी व्याकुळ होत मनसेचं इंजिन धापा टाकत आहे तिथंच थांबलेलं दिसतं.
खरंतर मनसेच्या बदलत्या भूमिकाही त्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप केला जातो. स्थापनेवेळी एखादी एनजीओ…सेवयंसेवी संस्था असावी असा आदर्श राजकारणाचा अजेंडा मांडणारी मनसे यश मिळत नाही, असं दिसताच कडवटपणे आक्रमक मराठीवादाकडे वळली. परप्रांतियांवर हल्लेही केले. त्यामुळे २००९मध्ये चांगलं यशही मिळालं. पण २०१४ची मोदी लाट येता येता मराठीवादाचा अजेंडा विरला.
२०१४च्या निवडणुकीत मनसेनं मोदीभक्तांनीही लाजवणारं मोदी मोदी केले. पण भाजपाने काही सोबत घेतले नाही. २०१४ची विधानसभा एकट्यानं लढवणाऱ्या भाजपाला राष्ट्रीय समाज पार्टी आवडली. आरपीआय चालली. पण मनसे काही आठवली नाही. २०१९ येता येता मनसेच्या इंजिनानं दिशा बदलली. मोदी मोदी ऐवजी त्यांच्यावरच वचनभंगाचा आरोप करत लाव रे तो व्हिडिओची भाजपाविरोधी, आघाडीच्या फायद्याची आक्रमकता दाखवली. तरीही काही राजकीय लाभ झाला नाही. उलट शिवसेनेने भाजपाची साथ सोडत पलटी मारली. आघाडीसोबत जात सत्ता मिळवली.
मनसेनं पुन्हा दिशा बदलली. बंजरंग दलछाप आक्रस्ताळ्या हिंदुत्वाच्या नव्या मार्गावर निघाली. दोन वर्षे झाली. मनसेनं शिवसेनेसह आघाडीला त्रस्त करणारी आंदोलनं केली. भाजपाला फायदाही झाला. पण अयोध्येला जाऊन हिंदुत्ववादी भूमिका राष्ट्रीय स्तरावर मांडण्याचा प्रयत्न करताच भाजपाचे खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंचा अपमानास्पद उद्धार केला. धमकावलं. भाजपाने काहीच केले नाही. अखेर चुहा वगैरे अपशब्द ऐकत राज ठाकरेंना अयोध्या दौरा रद्द करण्याची नामुष्की सहन करावी लागली. तरीही मनसेनं यावेळी भाजपापुरक भूमिका कायम राखली. मंत्रालयात जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेटही घेतली. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाला सन्मानजनक माघारीची संधी देणारं पत्रही लिहिलं. मनसेच्या फलकावर एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीसांची छायाचित्रं झळकवली. अखेर मनसेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिसले. राजकीय भाषणंही रंगली.
पण प्रश्न एवढाच आहे, निष्ठेनं साथ देणाऱ्या मनसेला भाजपा यावेळी तरी सोबत घेणार? साथ देणार? की शिवसेनेची मतं फोडण्यासाठी स्वतंत्र लढवत राजकीय हौतात्म्यासाठी एकटं सोडणार? पाहूया घोडामैदान जवळंच आहे…
पाहा: