उदयराज वडामकर / कोल्हापूर
कोल्हापूर परिसरातील वन्यजीव प्रेमींसाठी वाईल्ड लाइफ फोटोग्राफी अनुभवण्याची संधी आहे. गेले दोन दिवस एक खास प्रदर्शन सुरु आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचे औचित्य साधून वनविभागातर्फे ‘वाईल्ड लाईफ’ फोटोग्राफी प्रदर्शनाचे शाहू स्मारक भवन, दसरा चौक या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. रविवारी या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.
‘वाईल्ड लाईफ’ फोटोग्राफी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार श्रीमती जयश्री जाधव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदी उपस्थित होते.
राधानगरी-दाजीपूर या अभयारण्यामध्ये वन्यजीवांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. त्यामुळे कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत ११ मार्च ते १३ मार्च या कालावधीत राधानगरी अभयारण्यामध्ये वाईल्डलाइफ फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील ३० पेक्षा अधिक नामांकित फोटोग्राफर्सनी आपला सहभाग नोंदवला होता. यामधून निवडण्यात आलेली सत्तरहून अधिक छायाचित्रे या प्रदर्शनामध्ये वन्यजीव प्रेमींना पाहायला मिळणार आहेत.
राधानगरी अभयारण्यातील जैवविविधता पाहण्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी तसेच वन्यजीव प्रेमी व अभ्यासकांनी दि. २२ ते २४ एप्रिल या कालावधीत या छायाचित्र प्रदर्शनाला (शाहू स्मारक भवन, दसरा चौक) आवश्य भेट द्यावी, असे आवाहन कोल्हापूर विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) विशाल माळी यांनी केले.