मुक्तपीठ टीम
मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद नेहमी वैज्ञानिक प्रकल्प राबवत असते. मुलं नेहमी आपल्या परिसरातील विषय निवडून या परिषदेत सहभाग घेत असतात. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या राज्यस्तरावर सादरीकरणासाठी यंदा ‘रानभाज्या – एक शाश्वत अन्नस्त्रोत’ या प्रकल्पाची निवड झाली आहे. पालघरच्या वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मोजच्या विद्यार्थ्यांच्या गटाने हा प्रकल्प तयार केला आहे. जिल्हा स्तरावर बालविज्ञान परीषदेत मोज शाळेच्या दोन गटांनी सहभाग घेऊन सादरीकरण केले होते.
रानभाज्या प्रकल्पात नेमक्या कोणत्या गोष्टीचा समावेश
- या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेकरिता मोज जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘ रानभाज्या – एक शाश्वत अन्नस्रोत’ हा विषय निवडून संशोधन केलं आहे.
- रानभाज्या हा ग्रामीण भागातील लोकांच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे.
- या रानभाज्या कोणत्या, त्या कधी खातात त्यातील कोणत्या रानभाज्या साठवून ठेऊन वर्षभर खाल्ल्या जातात, त्यावर कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात.
- तसेच रानभाज्या सोबतच काही प्रथा व परंपरा देखिल जोडल्या आहेत का? असे विविध पैलू या प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांनी अभ्यासत आपला प्रकल्प सादर केला आहे.
- प्रकल्पासंदर्भात अभ्यास करताना मुलांनी ज्येष्ठांच्या मुलाखती घेतल्या, प्रत्यक्ष सर्वेक्षण केले, रानभाज्या विषयावरील पुस्तके वाचली तसेच परिसर भेटी देऊन रानभाज्यांच्या अधिवासांचा अभ्यास केला.
- रानभाज्या अभ्यासकांशी बोलून या अभ्यासाची गरज व व्याप्ती समजून घेतली.
- रानभाज्या मिळण्याची आताची आणि पुर्वीची स्थिती समजून घेऊन त्यांचं जतन व संवर्धन होण्यासाठी मुलांनी जाणीव- जागृतीचा कार्यक्रम आखायचं काम सुरू केले आहे.
या प्रकारचे वैज्ञानिक प्रकल्प करताना मुलं अनेक महत्त्वाचे घटक प्रत्यक्ष अनुभवातून शिकत असतात. मुलं कृती करून शिकत असल्यामुळे शिकण्याचा प्रवास आनंददायी असल्याचे मत प्रकल्पाचे मार्गदर्शक शिक्षक किशोर काठोले मांडतात. तर या प्रकल्पाच्या अभ्यासात विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास पाटील, पदवीधर शिक्षक दत्तात्रेय शिंदे , सहशिक्षक गुरुनाथ आवाटे, रोहिदास वाघ यांनी विशेष मार्गदर्शन केलं आहे.
रानभाज्या प्रकल्पाच्या अभ्यासात लोकसंस्कृतीचे महत्व
- प्रकल्पाच्या अभ्यासात रानभाज्यांचं लोकसंस्कृतीशी जोडलेले महत्व विद्यार्थ्यांना समजून घेता आलं.
- जसे कुळूची भाजी कुळदैवताला नैवेद्य दाखवून मगच खातात.
- तसेच काही समाजात तर सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आणून मग कुळूची भाजी खाल्ली जाते.
- यासारख्या विविध सांस्कृतिक परंपरा आणि वैशिष्ट्ये प्रकल्पाच्या निमित्ताने समजून घेतानाच विद्यार्थ्यांना ग्रामीण खाद्यसंस्कृती अभ्यासता आल्याने त्यांना वेगळा अनुभव मिळाला.
पाहा व्हिडीओ: