मुक्तपीठ टीम
राज्याच्या गृहमंत्रीपदावरून अनिल देशमुख पायउतार झाल्यानंतर भाजपाने संजय राठोडानंतरच दुसरं लक्ष्य साधले आहे. त्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी थेट परिवहन मंत्री अनिल परब यांचं नाव घेत यानंतर नंबर अनिल परब यांचा लागणार आहे असे सांगितलं होतं. पण मध्येच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली. गुरुवारी परबांवर ईडीचं धाडसत्र सुरु झालं आहे. त्यानंतर सोमय्यांनी आता परबांनी कपड्याची बॅग भरावी, असा खोचक सल्ला दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ माजली आहे. सोमय्यांच्या हिटलिस्टवर अॅड. अनिल परब का आहेत यावर राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरण हे बनावट असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यापासून शिवसेना लक्ष्य झाली होती. मात्र, त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर थेट आरोप करणारा शंभर कोटीच्या महावसुलीचा आरोप करणारा लेटर बॉम्ब फोडला. त्यानंतर स्फोटके प्रकरणातील आरोपी सचिन वाझेच्या शिवसेना संबंधांचा हवाला देत भाजपाच्या रेंजमध्ये असलेली शिवसेना काहीशी बाजूला गेली. अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीवरच हल्लाबोल सुरु झाला. मात्र, त्याचवेळी सोमय्यांसह काही नेत्यांनी सचिन वाझेंच्या संपर्कात असलेल्या एका विधान परिषद सदस्याचा उल्लेख करत संशय निर्माण करणे सुरु ठेवले होते. पुढे तर थेट नाव घेत गृहखात्याबद्दल अनिल परबांना लक्ष्य करण्यात आले. पण पुन्हा फडणवीस, एनसीबी यांच्यावर आक्रमक चढाई करणारे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने डी कंपनीच्या संबधितांशी जमीन व्यवहाराचा आरोप ठेवत त्यांना गजाआड केलं. त्यानंतर आता अनिल परबांविरोधातील रेंगाळलेली कारवाई सुरु झाली आहे.
अनिल परब का भाजपाच्या हिटलिस्टवर?
- शिवसेना, ठाकरे कुटुंबीयांच्या जवळच्या वर्तुळात अनिल परब हे विश्वासू म्हणून ओळखले जातात.
- कॉर्पोरेट सेक्टरपासून न्यायालयीन वर्तुळापर्यंत अनिल परबांचा वावर असतो.
- शिवसेनाप्रमुखांचे मृत्यूपत्र असो की शिवसेनेची कोणतीही कायदेशीर लढाई तेथे अनिल परब असतातच असतात.
- मनसे नगरसेवक फोडण्यापासून ते इतर अनेक गोपनीय राजकीय हालचालींमध्ये परब हे कुठेही, काहीही न बोलता सक्रिय असतात.
- ठाकरे मंत्रिमंडळात परिवहन मंत्री असलेले अॅड. अनिल परब हे तसे मितभाषी आहेत, मात्र ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेसाठी ते
- रस्त्यावरच्या शिवसैनिकासारखे आक्रमक होतात.
- सत्ता आल्यापासून त्यांच्या वागण्यात काहीसा तुटकपणा, अंहभाव आल्याचे मानले जाते.
- त्यामुळे त्यांच्या जवळचीही काही माणसे दुरावली आहेत.
- त्यातूनच त्यांच्या हालचालींची माहिती भाजपाच्या नेत्यांना मिळू लागली असावी.
- त्यातूनच शिवसेनेच्या या महत्वाच्या मोहऱ्याला लक्ष्य करण्यासाठी भाजपाने निवडले असावे, अशी शक्यता आहे.
अनिल परबांवर ईडीच्या धाडी, सोमय्या म्हणतात, “कपड्याची बॅग तयार ठेवावी!”
अनिल परबांवर ईडीच्या धाडी, सोमय्या म्हणतात, “कपड्याची बॅग तयार ठेवावी!”