मुक्तपीठ टीम
विधान परिषदेचा अर्ज मागे घ्यायला अगदी ५ मिनिटांची वेळ शिल्लक असताना सदाभाऊ खोत यांना अर्ज माघारी घ्यायला लावला गेला आणि त्यांची आमदारकीची इच्छा सध्या तरी अतृप्तच राहिली. तरीही सदाभाऊ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसाठी आक्रमक होताना दिसत आहेत. त्याचं कारण शोधलं असता त्यांना भविष्यातील राजकारणासाठी फडणवीसांचा आशीर्वाद अत्यावश्यक आहे. याची कल्पना असल्यानेच ते उघडपणे सांगतात, “देवेंद्र फडणवीसांच्या साथीने मागे घेतलेली दोन पावलं नक्कीच चार पावलं पुढं टाकण्यासाठी असतील!”
सदाभाऊ खोतांचा प्रवास…स्वाभिमानी ते देवेंद्रवादी!
- सदाभाऊ खोत हे मुळात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते होते.
- भाजपाच्या सत्ताकाळात राजू शेट्टींची इच्छा नसताना फडणवीसांनी सदाभाऊंना मंत्रीपद दिलं.
- त्यामुळे पुढे राजू शेट्टींशी मतभेद वाढल्याने सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेची वेगळी चूल मांडली.
- यावेळी त्यांच्या विधान परिषद आमदारकीची मुदत संपली.
- भाजपाने पहिल्या पाच उमेदवारांमध्ये त्यांना संधी न देता सहावे उमेदवार म्हणून पाठिंबा देऊ केला.
- पण मुळातच पाचव्या उमेदवारासाठीच आमदारांची जमवाजमव करावी लागत असल्याने सहाव्या उमेदवारासाठी प्रयत्न करणे टाळण्याचा भाजपाने निर्णय घेतला.
- त्यामुळे सदाभाऊंचा उमेदवारी अर्ज ऐनवेळी मागे घेण्यात आला.
- यांनी भापजाविरोधात वक्तव्य करणाऱ्यावर सडकून टीका केली आहे.
फडणवीसांच्या साथीवर सदाभाऊंचा विश्वास!
- मतांची गोळाबेरीज करणं कठीण गेलं असतं, म्हणून विधानपरिषद निवडणूकीतून माघार घेतली.
- देवेंद्र फडणवीसांच्या साथीने मागे घेतलेली दोन पावलं नक्कीच चार पावलं पुढं टाकण्यासाठी असतील.
- सदाभाऊ खोत यांच्या माघारीनंतर आता भाजपाचे ५ अधिकृत उमेदवार विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात असतील.
- म्हणजेच विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असतील.
पाहा सदाभाऊ कसे भाजपाविरोधकांविरोधात तुटून पडतात…
देहूत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राचा अपमान झाला असा आरोप केला होता. यावर सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र आले की मला पहाटेचा शपथविधी आठवतो. मला दोघे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासारखे दिसतात. त्यावेळी सुप्रिया सुळे झोपेत असतील. त्यामुळे पहाटेच्या शपथविधी झाला हे त्यांच्या लक्षात नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होतं, उपमुख्यमंत्री कोण होतं हे त्यांच्या लक्षात नाही. त्यामुळे ताई म्हणतात महाराष्ट्राचा अपमान झाला.पण काही झालं नाही. महाराष्ट्र खूशीत आहे.
शरद पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला सदाभाऊंनी उत्तर दिलंय. उस्मानाबादमधील कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले होते, “काही जण निवडणूक होण्यापूर्वीचं मी येणार मी येणार असं म्हणत होते. मात्र, आम्ही येऊ दिलं नाही. फडणवीसांवरील या टीकेला उत्तर देताना सदाभाऊ म्हणाले, “येणारे येतीलच, पण पंतप्रधानपदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही, हे मात्र नक्कीच.
२०२४ मध्ये होणारी निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाणार आहे. असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले होते. आव्हाडांच्या विधानाला सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. ”जनतेनंही ठरवलयं २०२४ मध्ये बदल हवाच. महाविकास आघाडी सरकारचे कुशासन ते भाजपचे सुशासन. उघड दार देव आता उघड दार देव ….” असे टि्वट करीत सदाभाऊ खोत यांनी आव्हाडांना उत्तर दिले होते.
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यापासून रोखले. त्यांना रोखण्यासाठी खुली धमकी देण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकार हे राज्य तुम्ही गुंडांची टोळी म्हणून चालवत् आहात का ? मविआ सरकारने लक्षात असू द्यावे की , उद्या सोमय्या यांच्या केसाला जर धक्का लागला तर त्याच क्षणी महाराष्ट्र राज्यामध्ये हे सरकार बरखास्त झालेले असेल , असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला होता.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून येणार आहेत. यावर आमचा ठाम विश्वास आहे. पण आम्हाला आता वेगळे देवेंद्र फडणवीस बघायचे आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही राज्यात पुन्हा येणार आहात. त्यावेळी मात्र बारामतीच्या गड्यांना आत घेवू नका, असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी यावेळी केले. उजनीतून बारामतीला एक थेंब ही पाणी जाऊ देणार नाही. पालकमंत्र्यांनी कंस मामाची भूमिका घेऊ नये अन्यथा श्रीकृष्ण रूपी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने कंस मामाला आम्ही गाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.